Monday, May 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यNarayan Rane : जय - पराजय आणि राणे...!

Narayan Rane : जय – पराजय आणि राणे…!

  • माझे कोकण : संतोष वायंगणकर

लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजेल म्हणजे निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात जाहीर करेल, असे अपेक्षित आहे. निवडणुका केव्हाही होऊ दे, परंतु त्याची वातावरणनिर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणातील रायगड व रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असतील याची उत्सुकता निश्चितच महाराष्ट्राला असणार आहे. रायगड मतदारसंघाचे नेतृत्व खा. सुनील तटकरे करीत आहेत, तर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व खा. विनायक राऊत करीत आहेत. २०१९च्या सर्वच निवडणुकांतील संदर्भ आजच्या घडीला पूर्णत: बदलले आहेत. महाराष्ट्राच राजकारणही त्याचप्रमाणे बदलले आहे. २०१९च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात खा. सुनील तटकरे यांनी भाजपा – शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव करून खा. सुनील तटकरे निवडून आले, तर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत खा. विनायक राऊत यांनी भाजपा – शिवसेना युतीतर्फे निवडणूक लढवली होती आणि त्यांच्यासमोर उमेदवार होते, स्वाभिमान पक्षातर्फे माजी खा. निलेश राणे! पक्षचिन्ह नवीन मात्र तरीही साडेतीन लाख मतं निलेश राणे यांनी घेतली.

खा. विनायक राऊत तेव्हा निवडून आले. आता २०२४ साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. उबाठा पक्षातर्फे खा. विनायक राऊत निवडणूक लढवणार आहेत. भाजपा, शिवसेना युतीतर्फे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण असेल? याची राजकीय चर्चा होत असली, तरीही भाजपा-शिवसेनेने अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत.

निवडणुका जाहीर झाल्या की आपोआपच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असते. मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो किंवा विधानसभा, लोकसभेची निवडणूक असली तरीही चर्चा करायला काय जातयं म्हणत लोक सहज चर्चा करतात. त्याला खरेतर कोणतीच निवडणूक अपवाद नाही. तशी चर्चा लोकसभा निवडणुकीचीही होत आहे. कोणता लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार आहे, याची प्राथमिक चर्चा सर्वच पक्षांमध्ये सध्या सल्लामसलत होत आहे. अर्थात देशाच्या निवडणुका असल्या किंवा महाराष्ट्रातील निवडणुका असल्या, तरीही निवडणुका जाहीर झाल्या की, चर्चा मात्र कोकणची आणि कोकणच्या निवडणुकांचीच होत असते. कोकणातील रायगडमधून पुन्हा एकदा खा. सुनील तटकरे विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते अशी लढत होणार काय, हे पाहणे फार औत्स्युक्याचे आहे.

१९९० साली कोकणातील राजकारणात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एण्ट्री झाली आणि पुढची ३४ वर्षे नारायण राणे यांनी कोकणच्या राजकारणात आपला ठसा कायम ठेवला आहे. आज जेव्हा लोकसभा निवडणुकीची सहज कुठेही चर्चा होते तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार असतील, तर शंभर टक्के राणे विजयी होतील, असे सहज कोणीही बोलून जातो. त्याची कारणही तशीच आहेत. खरेतर नारायण राणे यांचा कोकण हा ‘विक पॉइंट’ आहे. कोकणचा विकास या एकमेव उद्देशाने झपाटलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. उबाठा सेनेचे खा. विनायक राऊत यांनी या लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवायला नारायण राणे घाबरले आहेत, ते पळ काढत आहेत असली राजकीय तथ्यहीन विधाने केली आहेत. घाबरणे आणि पळ काढणे हे दोन्ही शब्द केंद्रीय मंत्री नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाच्या जवळपासही नाहीत. त्यांना जे योग्य वाटतं ते स्पष्टपणे बोलणे… परिणाम आणि राजकीय बेरीज-वजाबाकी त्यांनी आजवर कधीच केल्याची माहिती कोणीही सांगू शकणार नाही. उलट रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे कोणती विकासकामे केली हे खा. विनायक राऊत किंवा उबाठा सांगू शकत नाहीत. कोणतेही प्रकल्प नाहीत, की आणखी काहीही नाही, सांगण्यासारखं कोणतंही एकही काम नाही. टॉवरची उभारणी, त्याचे उद्घाटन; परंतु टॉवर्सना रेंजच नाही हा अनुभव अखंड कोकणात घेण्यात आला आहे आणि मग खा. विनायक राऊत असतील की त्यांचे आमदार असतील, फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका हा एककलमी कार्यक्रम खा. राऊत यांनी कोकणात राबवला आहे. स्वत:च्या कार्य-कर्तृत्वाची रेषा मोठी करण्यासाठी टीका-टिप्पणी करून प्रयत्न केला; परंतु नारायण राणे यांच्या कार्य-कर्तृत्वाची रेषा एवढी मोठी आहे की, त्या जवळपासही कोणी पोहोचू शकत नाही. ही वस्तुस्थिती उबाठाचे नेतेही खासगीत बोलून दाखवितात. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निश्चितच विजयी होतील, याची खा. विनायक राऊत यांनाही पूर्ण कल्पना आहे.

जाता-जाता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बारकाईने पाहिल्यास एक बाब स्पष्ट होते की, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील विधानसभा, विधान परिषद, संसदेत राज्यसभा नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा सर्व उच्च पदांवर विराजमान झाले. कार्य कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. विकासाची वेगळी दृष्टी असणारा नेता ही इमेज त्यांनी अथक परिश्रमाने निर्माण केली, जपली.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागला; परंतु २०१४ ते २०२४ या गेल्या दहा वर्षांत नारायण राणे यांनी जी गरूड झेप घेतली ती सर्वांना थक्क करायला लावणारीच आहे. राजकारणातून राणे संपले असे जे म्हणत होते, ज्यांना वाटत होते, ते मात्र गेल्या दहा वर्षांतील राणेंचा प्रवास पाहून आज काही बोलत असतील ती त्यांची अगतिकता आहे. त्यामुळे २०२४ मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभागृहात दिसले, तर कुणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नियती ज्यांच्या सोबत असते त्यांना रोखणे अवघड असते, एवढे निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -