Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीउद्योजक होण्यासाठी मानसिकता तयार करा

उद्योजक होण्यासाठी मानसिकता तयार करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातल्या मुंबईतूनच देशाच्या तिजोरीत ३४ टक्के उत्पन्न जाते. पण, यात आपण नेमके कुठे आहोत हे पाहिल्यास आपण कुठेच नाही, हे दिसून येईल. त्यामुळे आत्मपरीक्षण करा. उद्योजक होण्याची आणि उद्योजक घडवण्याची मानसिकता तयार करा. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करा. यासाठी लागेल ती मदत तयार करण्यासाठी आमचे मंत्रालय तयार आहे, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दिली.

दुपारी दोन ते चार, या वेळेत राणे यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना उद्योजक होण्यासाठी तसेच इतरांना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी आपले मंत्रालय कोणते प्रयत्न करत आहे, याची माहिती देत मार्गदर्शन केले. त्यांच्या मंत्रालयातले अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.

देशाचा अर्थसंकल्पच ३४ लाख कोटींचा आहे. यंदा तो आणखी वाढेल. जितका अर्थसंकल्प मोठा तितके उत्पन्न वाढायला हवे. देशाला आत्मनिर्भर करायचे असेल, महासत्ता होण्याकडे वाटचाल करायची असेल तर यादृष्टीने विचार करावाच लागेल, असे ते म्हणाले.

देशात साधारण सात कोटी उद्योजक आहेत. त्यातून ११ कोटी रोजगार निर्माण झाला पाहिजे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेत उद्योजक होण्याची मानसिकता दिसत नाही. मी लहान वयातच उद्योजक झालो. मला मार्गदर्शन करणाऱ्यांनी सांगितले की, आता तुम्हाला पगार किती मिळतो- पाच हजार.. पुढे तो १० हजार होईल.. पढे प्रमोशन मिळाले तर एक लाख होईल. पण पुढे काय? सल्ला ऐकला आणि उद्योजक झालो. आज दोन लाख, पाच लाख, २५ लाख, ५० लाख मिळवणारेही आहेत. मुंबईत हातगाडी ढकलणारा जुहूला बंगल्यात राहतो. मर्सिडीज घेऊन फिरतो, असे नारायण राणे म्हणाले.

सूक्ष्म उद्योग सुरू करा. पुढे लघू उद्योजक बना. नंतर मध्यम उद्योजक बना. ३-४ वर्षांपासून पुढे २०-२० वर्षांचे नियोजन करून उद्योग सुरू करा. यासाठी मार्गदर्शन, मशीनरी, निर्यातीसाठी हवी ती मदत करण्याचे काम आमचे मंत्रालय करते, असे सांगून ते म्हणाले, मी व्यवसायातूनच प्रगती करत त्यातून राजकारण केले. दुसऱ्याच्या पैशावर, दुसऱ्याच्या खिशात हात घालून राजकारण करत पेपरमधून झळकत नाही राहिलो, असा टोलाही त्यांनी लगावला.

नारळाच्या किशीवर आधारीत उद्योग केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा चार राज्यांतच होते. आता दुसऱ्या राज्यांमध्येही, जेथे नाहीत तेथे मदत केली पाहिजे, असे धोरण आपण स्वीकारले आहे. पुढच्या २०-२५ वर्षांत कोणत्या उद्योगांना चांगला वाव आहे, याची चाचपणी करून उद्योग सुरू करा. आता कोकणातही उद्योग जाणार.. महाराष्ट्रातही जाणार.. असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला.

ते दुकान सध्या बंद

यावेळी उपस्थित अधिकारी वारंवार लघू- सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय, मंत्रालय असा उल्लेख करत होते. तेव्हा राणे यांनी त्यांना थांबवत कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा नाहीतर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील ज्याचे दुकान सध्या बंद असल्याचा, असा खोचक लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -