Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत वेगाने वाढतोय कोरोना

मुंबईत वेगाने वाढतोय कोरोना

वांद्रे, खार, कुलाबा, परळ, अंधेरी, एलफिंस्टन, माटुंगा, ग्रँट रोड, गोरेगाव, चेंबूर आणि कुर्ला ही ११ ठिकाणे आहेत हॉटस्पॉट

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना शासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत.

मुंबईत दररोज ३०० हून अधिक नवीन रुग्ण

मुंबईतल्या अनेक ठिकाणी सध्या कोरोनाची प्रकरणे आढळून येत आहेत. पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतले ११ वॉर्ड सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. येथे वारंवार कोरोनाची नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. इतकेच नाहीतर या वॉर्डांमधील कोरोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज ३०० हून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.

अधिक माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे, खार, कुलाबा, परळ, अंधेरी, एलफिंस्टन, माटुंगा, ग्रँट रोड, गोरेगाव, चेंबूर आणि कुर्ला या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. या भागातील कोरोना रुग्णांचा साप्ताहिक वाढीचा दर ०.०२८ टक्के ते ०.०५२ टक्के आहे, तर मुंबईचा सरासरी साप्ताहिक वाढीचा दर ०.०२६ टक्के आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाची ७११ नवी प्रकरणे समोर आली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७८,८७,०८६ वर पोहचली आहे. काल एकाचा मृत्यू झाला तर मृतांची संख्या वाढून १,४७,८६० झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ३,४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशात आढळले २७४५ नवे कोरोना रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत 2745 नवे कोरोनाबाधित आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2236 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 17 हजार 810 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली.

गेल्या 24 तासांत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे एकूण 5 लाख 24 हजार 636 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात 711 नवीन रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत कोरोनाचे महाराष्ट्रात 711 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचे 373 तर तामिळनाडूमध्ये 100 नवे रुग्ण सापडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजारांवर पोहोचली आहे. सध्या देशात 18 हजार 386 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -