Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीईडी चौकशीमुळे काँग्रेस हैराण झालीय- व्ही.के. सिंग

ईडी चौकशीमुळे काँग्रेस हैराण झालीय- व्ही.के. सिंग

नागपूर (हिं.स.) : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीमुळे काँग्रेस हैराण झाली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात आणि योजनेसंदर्भात तरुणांना भडकवणे, हिंसेला चिथावणी देणे असले उद्योग करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी रविवारी नागपुरात सांगितले.

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात काँग्रेसने नवी दिल्लीत सत्याग्रह सुरू केला आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी ‘अग्निपथ’ योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच हे सरकार तरुणांचे नव्हे तर उद्योगपतींचे हित डोळ्यापुढे ठेवून काम करत असल्याची टीका देखील वाड्रा यांनी केली.

यापार्श्वभूमिवर ‘जन आक्रोश’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी नागपूर दौऱ्यावर असलेल्या व्ही.के. सिंग यांनी सांगितले की, काँग्रेस सध्या ईडीच्या तपासावर नाराज आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेनंतर त्यांची हतबलता दिसून येते. हिंसक निदर्शने आयोजित करणे, तरुणांची आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करून सरकारच्या विरोधात आंदोलन करवून घेणे हे त्यांचे काम आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष केवळ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्नात असतात.

सामान्य नागरिकांनी लष्करी प्रशिक्षण मिळाले पाहिजे ही फार जुनी मागणी आहे. लोकांनी एनसीसी ऐवजी थेट लष्कराकडून प्रशिक्षण मिळावे अशी मागणी होती. अग्निपथ योजना ही या मागणीची पूर्तता करते. लष्कर हे रोजगाराचे साधन नाही. ती कंपनी किंवा दुकान समजू नये. देशात १९६१ मध्ये इमर्जन्सी आयोग तयार करून देशात एक योजना सुरू करण्यात आली. ज्याअंतर्गत ३ महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक जण सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाले. पुढे १९६५ मध्ये त्या लोकांच्या सेवा संपल्या. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या लोकांना पेन्शन दिली जात नव्हती. त्यानंतर देशात ५ वर्षांचा शॉर्ट सर्व्हिस कमिशनही सुरू करण्यात आले होते. काँग्रेस आणि विरोधी पक्ष अशा जुन्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात संभ्रम पसरवण्यात मग्न असल्याचा दावा व्ही. के. सिंग यांनी केला.

देशात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे २ व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आंदोलक कोणत्या मुद्द्यावर रस्त्यावर आले आहेत हे कळत नसल्याचे संवादातून कळते. त्यामुळे या तरुणांना भडकावले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलक तरुणांबाबत व्ही के सिंग यांनी स्पष्ट केले की, लष्कर हे रोजगार बोर्ड नाही. प्रवेशासाठी तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल. जे निकष पूर्ण करतात, त्यांना सैन्यात भरती केले जाते. निकषांची पूर्तता केल्याशिवाय, सैन्यात भरती होणे शक्य नाही. त्यामुळे अग्निपथ योजनेला थेट रोजगाराशी कसे जोडता येईल..? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -