Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीचायनीज खाणा-यांनो, इकडे लक्ष द्या!

चायनीज खाणा-यांनो, इकडे लक्ष द्या!

शरीराला घातक ठरलेल्या एमएसजी अजिनोमोटोचा सर्रास वापर

उरण (वार्ताहर) : शहर व गाव सगळीकडे सध्या रस्त्यांवर चायनीज गाड्यांचे पेव फुटले आहे. अस्वच्छ वातावरणात, उघड्यावर चायनीज पदार्थांच्या नावाखाली एक प्रकारचे विष लोकांना पुरविले जात आहे. लोकही स्वस्तात चटकदार पदार्थ मिळतात म्हणून अशा पदार्थांच्या आहारी जात आहेत. बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेल्या अजिनोमोटोचा वापर प्रामुख्याने चायनीज पदार्थ करण्यासाठी केला जात आहे. त्याचा मानवी स्वास्थ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी या चायनीज गाड्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व उघड्यावर सुरु असलेल्या चायनीज गाड्यांची तपासणी करुन त्यावर बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक नेते अशोक म्हात्रे यांनी केली आहे.

आजच्या घडीला रस्त्यांवर चायनीज पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. नाक्यानाक्यांवर कोणतीही परवानगी न घेता चायनीज पदार्थांच्या विक्रीच्या गाड्या उभ्या असलेल्या नजरेस पडतात. या ठिकाणी सर्रासपणे खाद्यपदार्थ तयार करताना अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजे मोनो सोडियम ग्लुटोमेट (एमएसजी) हे रसायन आहे. ज्याचा वापर पदार्थाला चव आणण्यासाठी केला जातो व चायनीज पदार्थ शिजवताना केला जातो. त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम घातक आहेत.

अजिनोमोटो हे एक प्रकारचे स्लो पॉयजन

अजिनोमोटो ही जपानमधील प्रख्यात कंपनी असून त्याद्वारे याची निर्मिती केली जाते. १९०८ साली शोध लागलेल्या अजिनोमोटोचा वापर जगातील अनेक देशात केला जात असला तरी भारतात वर्षाला ५ हजार मेट्रिक टन अजिनोमोटो आयात केले जाते. अजिनोमोटो हे एक प्रकारचे स्लो पॉयजन असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत.

एमएसजीचा वापर जो केवळ चायनीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने होत होता, आता आपल्या घरात देखील वाढला आहे. बाजारातून आणलेले कोणतेही जंक फूड, इन्स्टंट तयार होणारे फूड तपासले तर त्यात एमएसजीच्या वापराने तोंडातील लाळ अधिक प्रमाणात स्त्रवते. ज्यामुळे पदार्थ अधिक चवीने आणि जास्त खाल्ला जातो. रक्तातील शर्करेचे प्रमाण त्यामुळे वाढते आणि स्थूलपणा हा सगळ्यात मोठा त्रास जाणवू लागतो.

एमएसजी पचनसंस्थेवर हळुवारपणे आघात करतो

एमएसजीच्या सततच्या सेवनाने उच्च रक्तदाब, स्थूलपणा, थायरॉईड, अस्थमा तसेच मधुमेह, हृदयविकार, मेंदू विकार वाढू शकतात असे सिद्ध झाले आहे. गरोदर स्त्रिया तसेच लहान मुलांमध्ये याचा वापर आरोग्याला घातक आहे.

सततच्या एमएसजीच्या वापराने इतर पदार्थांची तोंडाची चव हळूहळू कमी होत जाते. अनेकांना पोटात जळजळण्याचा त्रास सुरु होतो. एमएसजीच्या सततच्या सेवनाने एक प्रकारचे नैराश्य, थकवा जाणवणे असे प्रकार वाढत जाऊन पोटाच्या तसेच तोंडाच्या कॅन्सरला देखील एमएसजी कारणीभूत होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -