Saturday, May 4, 2024
Homeकोकणरायगडचरई ‘वडाचा कोंड’नजीक डोंगराला पडल्या भेगा

चरई ‘वडाचा कोंड’नजीक डोंगराला पडल्या भेगा

प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना

शैलेश पालकर

पोलादपूर : तालुक्यातील रानवडी रानबाजिरे धरणाच्या वरील बाजूच्या चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड गावालगत शनिवारी डोंगराला भेगा पडल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त होताच प्रशासनाने पाहणी करून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दीप्ती देसाई यांनी दिली.

मागील वर्षी २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे महाड तालुक्यातील तळिये येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन ८७ जणांचा मृत्यू झाला होता; तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व साखर सुतारवाडी येथे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी या घटनेला १ वर्ष पूर्ण झाले असून पोलादपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चरई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वडाचा कोंड गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगराला भेगा पडल्याची परिस्थिती तेथील शेतकरी सतीश बांदल हे शनिवारी सकाळी बकऱ्या आणि गुरांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले असता निदर्शनास आल्याने तत्काळ त्यांनी चरई ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कळविली. यानंतर चरई ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुशांत कदम यांनी डोंगराला भेगा पडल्याची माहिती पोलादपूर तहसील कार्यालयाच्या आपत्ती निवारण कक्षाला कळविली.

यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि महाड उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, तलाठी सुनील वैराळे यांनी एनडीआरएफच्या जवानांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान डोंगरावर जिथे भेगा पडल्या आहेत, त्याठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता दिसून आल्याने प्रशासनाकडून तत्काळ चरई वडाचा कोंड येथील ज्ञानेश्वरवाडी व हनुमानवाडी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी, भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करीत असताना प्रशासन स्थलांतरित जनतेची सर्व व्यवस्था करीत असून वडाचा कोंड ग्रामस्थांनी स्थलांतर केल्यानंतर त्यांची सर्व व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल, अशी ग्वाही दिली. मात्र, शनिवारी ग्रामस्थांचा प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी प्रशासनाने ग्रामस्थांसोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असून या बैठकीला ग्रामस्थांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -