Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनाचणी, वरईचे पीक शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक

नाचणी, वरईचे पीक शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक

पठार भागात लागवड, पावसामुळे रोपे जोमदार

शहापूर (वार्ताहर) : यंदाच्या खरीप हंगामात शहापुरात नाचणी, वरईचे पीक ३ हजार हेक्टरवर घेण्यात येत असून त्यासाठी १,९५० हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्याने नाचणी व वरईच्या पिकांची लागवड थोडी रखडली असली तरी भात लागवडीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत़ दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भातपिकांसोबत शहापूरच्या दुर्गम भागातील पठारी भागात मोठ्या प्रमाणात नाचणी व वरईची पिके घेण्यात येतात़ नाचणी व वरईचे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक उपयोग पाहता, त्यांचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे नाचणी वरईची पिके ही शेतकरीवर्गाला लाभदायक ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे़

या वर्षी पावसाची स्थिती अतिशय चांगली असल्याने भातरोपांची लागवड करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़ शहापूर तालुका हा दुर्गम व डोंगराळ भागांनी व्यापला असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पठारी व उताराचा भाग आहे. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजासोबत शेतकरी वर्ग असून या भागात पारंपरिक पद्धतीने उतारावर नाचणी, वरई, तीळ, खुरासणी आदी पिकांची लागवड करण्यात येते़ सपाट भूभागात भातशेती तर उतारावरील माळरानात नाचणी व वरईची पिके घेण्यात येत आहेत. या वर्षी २२ क्विंटल सुधारित बियाणे कृषी विभागाकडून वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ९५ टक्के बियाणे घरगुती पद्धतीचे वापरण्यात आले आहे.

नाचणीच्या पिकाला भातापेक्षा अधिक भाव मिळतो. कोरोनाच्या महामारीनंतर प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत सतर्क झाला असून सेंद्रिय भाजीपाल्यासोबत सेंद्रिय धान्याकडे अधिक वळला आहे़ त्यातच नाचणी हे धान्य मधुमेहींना अतिशय गुणकारक असल्याने दिवसेंदिवस नाचणीच्या मागणीत वाढ होत आहे़

आम्ही दरवर्षी परंपरागत बियाणे वापरतो. त्यामुळे आमचे दरवर्षी हजारो रुपये वाचतात. नाचणी, वरईला ३५०० रुपये इतका चांगला भाव मिळत आहे. ग्रामीण भागातील नाचणीला चांगली मागणी असून बाजारभावही चांगला मिळतो़
– रामा बांगारे, शेतकरी

आम्ही अनेक वर्षांपासून नागली व वरईचे पीक घेतो. यासाठी बियाणे विकत घेत नाही. पिकातूनच बियाणे बाजूला करतो. त्यामुळे हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये इतके वाचले आहेत. – दत्तू शेवाळे, शेतकरी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -