Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीविधान परिषदेसाठी बविआसाठी भाजपची मोर्चेबांधणी

विधान परिषदेसाठी बविआसाठी भाजपची मोर्चेबांधणी

दरेकर-महाजनांची विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांशी चर्चा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकूण १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे १० व्या जागेसाठी चुरस असेल. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे राज्यसभेतील भाजपच्या विजयाचा धुरळा राजकीय मैदानात उडाला असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही भाजपने मोट बांधायला सुरुवात केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता भाजपने विधान परिषदेची जोरदार तयारी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्षांनी भाजपला साथ दिली. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तीन आमदार असलेल्या बविआला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व प्राप्त झाले आहे. भाजपकडून सातत्याने बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी भेटीगाठी सुरू असल्याने बविआचा कल भाजपकडे झुकणार असल्याचे बोलले जात आहे.

येत्या २० जूनला १० जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपने घोडेबाजार होऊ नये म्हणून आमदारांची हॉटेलवारी केली आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचे मतदान अंत्यंत महत्वाचे मानले जात आहे. तसेच बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानाकडेही सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. हितेंद्र ठाकूर स्वत: आमदार आहेत. त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूरदेखील विधानसभेचे सदस्य आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावे आणि आपल्या बाजूने मतदान करावे यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

भाजपकडून पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. लाड यांच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतांचा कोटा भरण्यासाठी बविआच्या तीन आमदारांच्या मतांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार हिंतेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारमध्ये दाखल झाले व त्यांनी चर्चा केली. भाजप नेत्यांमध्ये आणि बविआच्या आमदारांमध्ये बंद दाराआड खलबते झाली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करावे, अशी मागणी हिंतेद्र ठाकूर यांच्याकडे भाजप नेत्यांनी केली आहे. परंतु, आपण कोणाला मतदार करणार आहोत, हे सांगायचे नसते. त्यामुळे आम्हा एकत्र बसून आणि निर्णय घेवू आणि मतदान करु. मत देताना वसई-विरारच्या विकासाचा विचार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया हिंतेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे बविआची मतदानाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -