Friday, May 3, 2024
Homeअध्यात्मभगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये

भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये

-ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

एक मुलगा घरातून पळून गेला, तेव्हा त्याची आई म्हणाली, ‘तो कुठेही राहू दे, पण खुशाल असू दे.’ तसे, तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे; वृत्ती सांभाळून नामात राहिलात, तर त्याहूनही जास्त बरे! वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहीमध्ये दूध, तूप किंवा पाणी घालावे लागते. तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी, त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. ‘मी ब्रह्म आहे,’ या अनुभवात मीपणा आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे, त्यामुळे प्रपंच सोपा होतो.

नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असे कोणतेही पाप नाही की, जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते, तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी, नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते अपूर्ण नाही. अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितले, तर ते लगेच घेणे चालू करतात; परंतु विद्वान लोक मात्र ‘नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन,’ असे म्हणतात. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरिता या क्षणापासून नाम घ्यायला सुरुवात करावी. आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडते ते करावे. रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे. भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा. नीतीने वागावे, भक्ती चांगली करावी, मग राम प्रसन्न होतो.

ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही; कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असते म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरिता आपण नाम घ्यावे, राम ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य असावा. ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला, त्याने जन्माला येऊन सर्व साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -