Monday, May 5, 2025

विशेष लेखसंपादकीय

मेकॉलेच्या पिलावळीची अस्वस्थता!

मेकॉलेच्या पिलावळीची अस्वस्थता!

रवींद्र मुळे : अहिल्या नगर

महात्मा गांधींनी इंग्रजांना ठणकावून सांगितले होते. There was beautiful tree of education in our country, you British destroyed it. (आमच्या देशात शिक्षणाचे सुंदर झाड होते, ते तुम्ही इंग्रजांनी नष्ट केले.) ही घटना स्वातंत्र्य पूर्व काळातील! यानंतर धर्मपाल यांनी ब्रिटिश गॅझेटमधले कागदपत्र शोधून ब्रिटिश पूर्व काळातील भारतीय शिक्षण व्यवस्था हे पुस्तक ‘ब्युटिफुल ट्री’ या नावानेच प्रकाशित केले.

या पुस्तकात वर्णन केलेली शिक्षण व्यवस्था ही भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल ब्रिटिशांनी निर्माण केलेले अनेक खोटे विमर्श खोडून काढणारी ठरली. सर्वांना शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, त्यातील ज्ञान आणि विज्ञान, जीवन शास्त्र, गुरुकुल पद्धत, संस्कृत प्रसार या सर्व गोष्टींबद्दल आश्चर्यकारक खुलासे त्यात सापडले.

भारत नावाच्या प्राचीन राष्ट्राची पाळेमुळे ज्यात खोलवर रुजलेली होती, येथील जीवनमूल्ये ज्यात समाविष्ट होती, येथील ज्ञान परंपरेचे ज्यात वर्णन होते, ज्यात पर्यावरणाची सूत्रे समाविष्ट होती आणि एक उत्तम माणूस घडवण्याची क्षमता असलेली ही शिक्षण पद्धती होती. अर्थात दीर्घकाळ सत्ता राबवण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या ब्रिटिशांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रथम आघात केला तो येथील शिक्षण पद्धतीवर! मेकॉलेने मांडलेल्या सूत्रानुसार त्यांनी काळा इंग्रज घडवायला सुरुवात केली. हळूहळू या शिक्षण व्यवस्थेने आमच्या मनाचा ताबा घेतला आणि आम्ही मानसिक गुलाम बनत गेलो. इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणण्या इतकी आमची मानसिकता झाली. त्यातून झालेले मानसिक आघात दीर्घकालीन होते. त्यापूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या विचाराने जगणारा आमचा समाज उत्तम नोकरी म्हणू लागला. कनिष्ठ शेती म्हणू लागला आणि आमची व्यवसायाभिमुख, ग्राम केंद्रीत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. जागतिक बाजारपेठेत सर्वात जास्त निर्यात करणारा देश, सर्वात जास्त GDP असणारा देश, सर्वात जास्त उत्पादने निर्माण करणारा देश हळूहळू ब्रिटिश लोकांची चाकरी करणाऱ्या बाबूंचा देश बनला.

स्वहरवलेल्या या देशात स्वातंत्र्याची चळवळ ज्या चतु:सूत्रीवर लोकमान्य टिळकांनी उभी केली त्यातील मुख्य सूत्र राष्ट्रीय शिक्षण होते. कारण मेकॉलेप्रणीत ब्रिटिश शिक्षण व्यवस्था ही मानसिक गुलामगिरी शिवाय काहीच निर्माण करत नव्हती. हे सगळे आमच्या देशात आधुनिक शिक्षण या नावाखाली ब्रिटिशांनी चालू केलेला गारुडी खेळ होता. खोटा इतिहास, पराभवाचा इतिहास, चुकीचा भूगोल, राष्ट्र आणि धर्म या शब्दांच्या बद्दल चुकीच्या धारणा आणि उज्ज्वल सांस्कृतिक परंपरांच्याबद्दल कमालीची घृणा अर्थात या सगळ्यांतून स्वचा विसर आणि धार्मिक, अध्यात्मिक तसेच कौटुंबिक व्यवस्थांची मोडतोड ही या शिक्षण पद्धतीची देणगी होती.

देशाच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेत अडथळा बनलेली ही शिक्षण पद्धती ब्रिटिश गेल्यावर हद्दपार होणे आवश्यक होती. पण ब्रिटिश गेले तरी त्यांचे पुत्र येथे होतेच. त्यांच्या या पुत्रांनी येथील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा ताबा घेतला आणि देशाचे स्वातंत्र्य केवळ (ट्रान्स्फर ऑफ पॉवर) सत्तांतर ठरले. मानसिक स्वातंत्र्यापासून आम्ही कोसो दूर राहिलो. याचा परिणाम म्हणून देशाच्या भूभागात हजार वर्षांच्या परकीय गुलामगिरीच्या खुणा तशाच अस्तित्वात होत्या. त्या आम्हाला आठवण करून देत होत्या तुमचा इतिहास गुलामगिरीचा आहे. पराभवाचा आहे. यातून अनेक सिद्धांताची मांडणी केली गेली आणि खंडित स्वातंत्र्याच्या मुळावर घाव घालण्याची प्रक्रिया सुरू झाली. आर्य बाहेरून आले या सिद्धांताची मांडणी करून उत्तर/दक्षिण किंवा आर्य/ द्रविड वाद निर्माण केले गेले. शहरवासी / मूलनिवासी हा वाद रंगवला गेला. हिंदू आणि शीख, बौद्ध, जैन यांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. खलिस्तानची मागणी याचाच भाग होता आणि दक्षिणेत निर्माण केली जाणारी अस्मिता किंवा भाषेचा संघर्ष असो शिक्षणातून निर्माण केलेल्या विमर्श प्रक्रियेचा हा परिणाम होता हे निश्चित.

नेशन इन मेकिंग नावाखाली या सनातन राष्ट्राची सांस्कृतिक ओळख संपवण्याचे स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिशांनी आखलेले शिक्षणाच्या माध्यमातून कारस्थान दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर काळे मेकॉले पुत्र आणि नव्याने या टोळीत सामील झालेले मार्क्स पुत्र ह्यांनी गतीने पुढे नेले. या व्यवस्थेतून देशाला मिळालेले शिक्षण मंत्री तसेच होते त्यातून JNU सारखे देशाच्या एकात्मतेवर बाधा आणणारे विद्यापीठे राष्ट्रविरोधी चळवळीची केंद्र बनत गेली. या शिक्षणाने आमच्या समाजाला मुघलवंश पाठ झाले. या शिक्षणाने आम्हाला व्हाॅइसरॉय सगळे पाठ झाले. पण राणा संग, पृथ्वीराज, राणा प्रताप, छत्रपती शिवराय, कृष्णदेवराय ही नावे, त्यांचा पराक्रम खचितच माहीत झाले. व्हिक्टोरिया राणी लक्षात राहिली, राणीचा बाग माहीत झाला पण ‘राष्ट्रमाता जिजाबाई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विस्मरणात गेल्या. या शिक्षणाने आमच्या क्रांतिकारकांचा पराक्रम एका पानात संपवला पण ह्यूम साहेबाने स्थापन केलेला काँग्रेसचा इतिहास मात्र पानोपानी आम्हाला वाचायला लावला. या शिक्षणाने प्रशासकीय व्यवस्थेत वाईन पिण्याची पद्धती प्रशिक्षणात तशीच ठेवली पण आम्ही जनतेचे आता सेवक आहोत आता ब्रिटिश राज्याचे प्रतिनिधी नाहीत ही भावना निर्माण नाही केली. फक्त ICS हे नाव बदलून IAS नाव इतकंच बदलले. मी येथे असा भारतीय माणूस तयार करेल जो रंगाने काळा पण विचार, आचरणाने इंग्रज असेल या मेकॉले धोरणाची अंमलबजावणी स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा अधिक गतीने ‘मौलाना आझाद ते नुरूल हसन’ या शिक्षण मंत्र्यांनी केली. नियतीशी करार केलेले आमचे पहिले पंतप्रधान हे या सगळ्या धोरणाचे प्रणेते होते तर त्यांची कन्या स्वतःच्या सरकारला वाचवण्यासाठी डाव्या मंडळींबरोबर राजकीय करार करताना आमच्या शिक्षणाच्या सत्त्वाचा बळी देत होती.

२०१४ साली मोदी सरकार आले अन् यात बदल घडू लागले. सकस राष्ट्रीय शिक्षण, उच्च सांस्कृतिक मूल्ये, मातृभाषेचा आग्रह, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करताना आपल्या जुन्या परंपरांमधील विज्ञान आणि पर्यावरण शास्त्र तसेच आमचा हजार वर्षांच्या तुलनेने १०,००० वर्षे जुना (विजिगीषु) इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. याचे एकत्रित सूत्र रूप म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होय. पण ज्यांना हे धोरण त्यांच्या राजकीय दुकानदारीवर आलेले संकट वाटते, ज्यांचे बोलावते धनी हे अजूनही परकीय आहेत, ज्यांचा या मातीतील संस्कृतीशी काही संबंध नाही ज्यांना मातृभाषा म्हणून एकही भारतीय भाषा सांगता येणार नाही त्यांनी शिक्षणाचे भगवे करण नावाची कोल्हेकुई सुरू केली.

देशात कुठेही राष्ट्रीय भावना विकसित व्हायला सुरुवात झाली, समाज जागृत होतो आहे असे दिसले की, भारतातील एक राजकीय नेत्यांची टोळी, विचारवंत मंडळींचा एक गट, काही ठरावीक परदेशी धार्जिणे प्रसारमाध्यमे धर्मनिरपेक्षतेची बांग द्यायला सुरुवात करतात. त्यातूनच सोनिया गांधी नामक काँग्रेसी नेतृत्वाने पत्राच्या उपद्व्यापातून थेट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संबंध संघराज्य पद्धतीशी जोडला आहे. स्वतःचे किंवा मुलाचे नेमके काय आणि किती तसेच कुठे शिक्षण झाले याचा पत्ता नसलेली ही मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि आपल्या परदेशी बसलेल्या सॅम पित्रोदा नामक आणि तत्सम काही मंडळींच्या प्रेरणेने देशात नवीन शैक्षणिक धोरणातून होऊ घातलेल्या आत्मनिर्भर भारताच्या पायाला कुठे तरी अडथळा निर्माण करण्याचा भारत घातकी प्रयत्न करत आहेत याचा जेवढा निषेध करू तेवढा थोडा आहे. मदरशांना अनुदान देताना तेथे दिल्या जाणाऱ्या जिहादी शिक्षणाबद्दल कधी हे बोलणार नाहीत. कॉन्व्हेन्ट नावाच्या प्रयोगातून गेले १००/१५० वर्षे आमच्या हिंदू समाजातील पिढ्यांचे अहिंदूकरण याला यांची मूक संमती मिळणार पण कुठे तरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून भारताची सांस्कृतिक अवधारणा सांगण्याचा प्रयत्न सुरू झाला की हे भगवेकरण म्हणून बोंब मारणार.

मुरली मनोहर जोशी यांच्या काळात या सगळ्या मंडळींनी हेच उद्योग केले. दुर्दैवाने अटलजी सरकार पडले आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रक्रिया खंडित झाली. यूपीए काळात सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली त्यात शिक्षणातील मिशनरी आणि डावा अजेंडा पुढे नेण्यात मेकॉले आणि मार्क्स पुत्र आघाडीवर होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जशी पुढे जाईल तशी ही मंडळी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अशा वेळी शिक्षणातील राजकारण हद्दपार करून पुढील पिढ्या घडवणाऱ्या शिक्षणासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी सज्ज, सजग आणि जागृत राहणे गरजेचे आहे. विकसित भारताच्या आकांक्षांना रोखून धरणारे सोरासप्रणीत नव वसाहतवादी पुन्हा नवे मेकॉले जन्माला घालण्यास सिद्ध झाले आहेत. त्याची पिलावळ त्यासाठीच प्रयत्नशील आहे.

Comments
Add Comment