Monday, May 5, 2025

अग्रलेखसंपादकीय

उबाठा सेनेचे पक्षप्रमुख सैरभैर

उबाठा सेनेचे पक्षप्रमुख सैरभैर

उबाठा सेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्रीपदी होते मात्र आता त्यांची सत्ता गेल्यापासून ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात मोदी सरकारवर आणि सध्याच्या कायदेशीरपणे निवडून आलेल्या महायुती सरकारवर चौफेर टीका केली. त्या टीकेत केवळ शिव्याशाप आणि फडणवीस सरकारवर प्रचंड टीका होती. पण त्या टीकेत अभ्यासूपणाचा जराही लवलेश नव्हता, ना कोणते व्हिजन होते. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या या माणसाकडे महाराष्ट्रासाठी काहीतरी व्हिजन किंवा दृष्टिकोन असेल असे वाटले होते. पण केवळ भाजपाला आणि मोदी यांना शिव्याशाप देण्यापलीकडे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या या नेत्याची मजल जात नाही हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. नेहमीप्रमाणे उबाठानी भाजपावर तोंडसुख घेतले आणि त्यात नेहमीची पोपटपंची होती. पाशवी बहुमत मिळवलेल्या सरकारने असा आरोप त्यांनी सरकारवर केला, पण सरकारवर निरर्थक आरोप करताना त्यांचे आरोप किती हास्यास्पद आहेत याची खात्रीच त्यांनी सर्वांना पटवून दिली आहे. उबाठा यांच्याकडे आता बोलण्यासारखे काहीही नाही. पक्ष एकनाथ शिंदे कधीच घेऊन गेलेत आणि सत्ताही राज्यात नाही. केवळ दोन आणि चार उरलेल्या शिलेदारांवर प्रभाव टाकण्यासाठी बडबड करून आपले वर्चस्व कायम राखण्याची धडपड असे त्यांच्या पक्षाचे स्वरूप उरले आहे. त्यांच्या बडबडीला कितपत महत्त्व द्यायचे ते कुणालाही पटत नाही.

उबाठा पक्षप्रमुखांनी एक आरोप केला की, सरकारचा अर्थसंकल्प हा निरर्थक होता. पण उबाठा यांना अर्थसंकल्पातील काय कळते हाच मुळात प्रश्न आहे आणि तो सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना अर्थसंकल्पावर बोलण्याचा काही अधिकार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. अपयश लपवणारे हे अधिवेशन होते अशी एक लोणकढी थाप उबाठा पक्षप्रमुखांनी मारली. पण यांच्या म्हणण्यात काहीही सत्य नाही हे सर्वांनाच माहीत आहे. राज्य आज प्रगतिपथावर आहे आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी राज्याला पुन्हा नंबर वन वर आणण्याचा निर्धार केला आहे हे सर्व राज्य जाणते. त्या दिशेने राज्याची पावले पडत आहेत आणि त्यामुळे उबाठा पक्षप्रमुखांचा पोटशूळ उठला आहे. कारण राज्य प्रगती करत आहे आणि त्यामुळे उबाठा पक्षप्रमुख आणि त्यांचा पक्ष यांचे धाबे दणाणले आहेत. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठा यांचे सर्वस्व पणाला लागले आहे आणि तेथेही त्यांची हार होणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे उबाठा पक्षप्रमुख सैरभैर झालेेत. त्यामुळे ते बेताल बडबड करत आहेत यात काही शंका नाही. उबाठा पक्षप्रमुख म्हणतात की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत आणि त्या चालूच आहेत. पण शेतकरी आत्महत्या हा वेगळा विषय आहे आणि उबाठा पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही त्या चालूच होत्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना निधी देऊ केला होता असा त्यांचा पक्ष दावा करतो. पण कित्येक शेतकऱ्यांनी आम्हाला एकही पैसा मिळाला नाही असे प्रत्यक्षात त्यांच्यासमोर सांगितले आहे. केवळ आपण केले असे दाखवायचे आणि प्रत्यक्ष करायचे काहीच नाही अशी उबाठा पक्षप्रमुखांची सवय आहे. ते म्हणतात की, या सरकारचा संकल्प कुठेच दिसला नाही. पण उबाठा पक्षप्रमुखांना भाजपा द्वेषाची कावीळ झाली असल्याने त्यांना चांगले काही दिसत नाही. त्यामुळे त्यांना या सरकारचे चांगले कामही दिसत नाही अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी याबाबत ते जे बोलतात ते नेहमीची रेकॉर्ड आहे आणि ती आता घासून गुळगुळीत झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगितले तरी समजणार नाही.

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मासिक पेन्शन योजना सुरू केली आणि त्यांच्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना थेट ६००० रुपये मिळतात आणि त्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे बोगस लाभार्थी दूर राहतात आणि खऱ्या लाभार्थींनाच मदत मिळते. पण उबाठा पक्षप्रमुखांना हे कोण सांगणार. त्यांचा सारा जन्म मोदी यांना आणि भाजपाला शिव्याशाप देण्यात चालला आहे. त्यासाठी त्यांना आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून बघावे लागेल, तर त्यांना मोदी सरकारने आणि राज्यातील भाजपाच्या महायुती सरकारने शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी काय केले आहे ते समजेल. उबाठा पक्षप्रमुखांनी टीका नेहमीप्रमाणे पातळी सोडून केली आहे आणि त्यांनी मोदी यांच्यावर सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता अशी योजना आहे अशी टीका केली. कारण मोदी यांनी येत्या ईदच्या निमित्त मुसलमानांना भेट देण्याची योजना जाहीर केली आहे. मोदी यांनी अल्पसंख्याकांना भेट देणे हा फक्त उबाठाचा अधिकार आहे असे ते समजतात. भाजपाने केवळ मुसलमानांना ईदनिमित्त भेट दिली तर भाजपाने हिंदुत्व सोडले अशी टीका उबाठा करतात. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की, उबाठांनी हिंदुत्व सोडून चक्क औरंगजेबप्रेमी पक्षांशी हातमिळवणी केली आणि आता त्यांच्या या चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार सुरू आहे. भाजपाने ध्वजावरील भगवा रंग कधी काढला ते जाहीर करावे असे उबाठा म्हणतात. पण उबाठांनी अगोदर आपले हिंदुत्व सोडले आहे आणि त्यांना यावर भाजपावर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. उबाठांनी सैरभैर होऊन मोदी यांसारख्या नेत्यावर जो या देशाचा पंतप्रधान आहे त्यांच्यावर टीका केली आहे. आता त्यांना विधानसभा आणि लोकसभेत तर लोकांनी धडा शिकवलाच आहे. पण मुंबई महापालिकाही त्यांच्या हातून जाणार यात काही शंका नाही. उबाठानी अशीच बडबड करत राहावे म्हणजे त्यांचा पराभव अधिक जवळ येईल.

Comments
Add Comment