Monday, May 5, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Punjab Bandh : शेतकऱ्यांचा पंजाब बंद; १५० ट्रेन रद्द!

Punjab Bandh : शेतकऱ्यांचा पंजाब बंद; १५० ट्रेन रद्द!

चंदीगढ : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने पंजाबमध्ये ‘रेले रोको’ आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी विविध रेल्वे मार्गांवर ठिय्या देऊन रेल्वे मार्ग रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आज किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे.

शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल हे किमान आधारभूत मूल्यासाठी कायदेशीर हमीसह आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मात्र अद्यापही केंद्र सरकारने काहीच निर्णय न शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका धारण केली आहे. शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिली असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक रोखून प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत करणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १५० ट्रेन रद्द केल्या आहेत. मात्र यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या ट्रेन रद्द?

उत्तर रेल्वेने ३ वंदे भारत एक्स्प्रेससह नवी दिल्लीहून कालका, चंदीगड आणि अमृतसरकडे धावणाऱ्या ३ शताब्दी एक्स्प्रेस आणि पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यावेळी प्रवाशांना त्रास न होण्यासाठी अंबाला पोलिसांनी दिल्ली आणि चंदीगड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना NH-44 मार्गे पंचकुला, बरवाला, मुल्लाना, यमुनानगर, रादौर, लाडवा आणि पिपली येथे पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment