Sunday, May 4, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Fengal Cyclone : तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार 'फेंगल' चक्रीवादळ!

Fengal Cyclone : तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार 'फेंगल' चक्रीवादळ!

'या' भागात सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर काल 'फेंगल' चक्रीवादळात (Fengal Cyclone) झाले होते. तर आगामी २४ तासात हे चक्रीवादळ अधिक तीव्र होत तामिळनाडूला धडकणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार आज दुपारी तामिळनाडूच्या किनारपट्टीला हे वादळ धडकणार असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Meteorological Department) अलर्ट जारी केला नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपाऱच्या सुमारास फेंगल’ चक्रीवादळ करैकल आणि महाबलीपुरम दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. या वेळी ताशी अधिकाधिक ९० किमी वेगाने धडकणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभाव ३ डिसेंबरपर्यंत कर्नाटक आणि केरळवर राहण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

कोणत्या भागात मुसळधार पावसाचा इशारा?

हवामान विभागाने चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरिची, कुड्डालोर आणि पुद्दुचेरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच राणीपेट, तिरुवन्नामलाई, वेल्लोर, पेरंबलुर, अरियालूर, तंजावूर, तिरुवरूर, मयिलादुथुराई आणि नागपट्टिनम या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शाळांना सुट्टी जारी

चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तामिळनाडू आपत्ती व्यवस्थापन विभागाने २,२२९ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून तिरुवरूर आणि नागपट्टिनम जिल्ह्यात १६४ कुटुंबांतील ४७१ लोकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तिरुवरूर केंद्रीय विद्यापीठाचा दौराही रद्द करण्यात आला आहे.

Comments
Add Comment