ठरवले मी या रविवारी, आरामात उठणार
घड्याळाच्या काट्यावर, मुळीच नाही पळणार
बिछान्यात शिरून, मनसोक्त लोळणार
मैदानावर सुद्धा मी, हवे तेवढे खेळणार
बागेतल्या गुलाबांशी, गप्पाही मारणार
तबला, पेटी, गाण्यात, मस्त रंग भरणार
रविवारचे हे बेत सारे, मीच केले पास
रविवार हा असेल माझा, एकदम झकास!
पण रविवार उजाडला, मोठ्या नाखुशीने
पाहुणे झाले हजर, सकाळच्याच गाडीने
घाई, गडबड आवाजाने, घर गेलं भरून
झोप माझी पळाली, बसलो डोकं धरून
पाहुण्यांची सरबराई, करण्यात वेळ गेला
बेत माझे सारेच, अहो, पडले बाजूला
पाहुण्यांचं बोलणं ऐकून, मी तर चक्रावलो
म्हणे, ‘आज रविवार, म्हणून मुद्दामच आलो.’
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) शहराच्या अपुऱ्या जागेसाठी
लोक पर्याय शोधतात
शहरापासून दूर दूर
वस्ती करू लागतात
कालांतराने अशी वस्ती
विस्तारत जाते
त्यातूनच सांगा मग
कुणाची निर्मिती होते?
२) मथुरा, उज्जैन, वाराणसी,
जयपूर आणि दिल्ली
खगोलीय वेधशाळांची
निर्मिती येथे झाली
खगोलशास्त्राचा येथे
अभ्यास होतो उत्तम
या खगोलीय वेधशाळांचे
नाव सांगा पटकन?
३) पावसाचे थेंब ढगात
जेव्हा थोपवले जातात
तेव्हा ते थेंब गारांमध्ये
रूपांतरित होतात
मोठ्या गारांसह जेव्हा
पाऊस पडतो मुसळधार
हा सांगा वृष्टीचा
कोणता बरं प्रकार?
उत्तर -
१) उपनगर
२) जंतरमंतर
३) ढगफुटी
eknathavhad23 @gmail.com