Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यदेखणे होताहेत विवाहसोहळे!

देखणे होताहेत विवाहसोहळे!

लग्नसराई सुरू झाल्यानंतर वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळते. सध्या हटके पद्धतीने लग्नसोहळा साजरा करण्याचा ट्रेंड लक्षवेधी ठरतोय. आमंत्रितांची संख्या कमी करून अगदी मोजक्या लोकांमध्ये देखणा विवाहसोहळा संपन्न करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. त्यातील अनेकजण चित्रसृष्टीमध्ये गाजलेल्या विवाह सोहळ्यांशी समांतर लग्न करताना दिसतात. या बदलत्या मानसिकतेचा वेध.

तुळशीच्या लग्नापासून देशामध्ये पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला. केवळ वधू-वरांच्याच नव्हे तर त्यांच्या मातापित्यांसह दोन्ही कुटुंबांसाठी हा सोहळा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंबांना आणि त्यातील सदस्यांना एका धाग्यात बांधत असल्यामुळे अनेकजण त्यात सक्रिय सहभागी होतात आणि प्रत्येक विधीचा आनंद लुटतात. अगदी केळवणापासून मुलीला सासरी पाठवण्यापर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. अर्थात आता लग्नसोहळ्याचे पूर्वी दिसणारे काहीसे गंभीर स्वरूप बदलले असून एक स्नेहमेळाव्याचे रूप प्राप्त होताना दिसत आहे.

थोडे मागे वळून पूर्वीचे लग्नसोहळे आठवून बघा. पेहरावापासून जेवणापर्यंतचा ठरावीक बाज, मानपान, रुसवे-फुगवे, आहेराच्या देवाण-घेवाणीची लगबग, पंगतीत बसण्यावरून बघायला मिळणारे कलगीतुरे या सगळ्यात बिचारे वधू-वर झाकोळून जायचे. किंबहुना, या सोहळ्यात त्यांना काही ‘से’ नसायचाच. आता मात्र लेटेस्ट ट्रेंड्स लक्षात घेऊन वधू-वरच आपल्या निकटवर्तीयांसवे या सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन करताना दिसतात. आयुष्यातील हा संस्मरणीय दिवस सर्वात देखणा, आपल्या मनाजोगा आणि ट्रेंडी करण्याचा सर्वांचाच नव्हे पण समाजातील एका वर्गाचा मात्र नक्कीच विचार असतो. वेगवेगळ्या थीम्सद्वारे ते आपल्या विवाहसोहळ्यात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. ‘बी टाऊन’मधील अनेक तारे-तारकांच्या हटके आणि भारदस्त विवाह सोहळ्यांकडून त्यांना प्रेरणा मिळते, हे नाकारून चालणार नाही.

अलीकडेच अभिनेता रणदीप हुडाने आपल्या मैत्रिणीसवे लग्नगाठ बांधली. त्याचा हटके विवाह समाजमाध्यमांवर चांगलाच गाजला. तरुणाईमध्ये त्याविषयी चर्चा रंगली. वास्तविक, या अभिनेत्याने आपले लग्न अत्यंत साधेपणाने आयोजित केले होते. मात्र अनोख्या स्टाईलमुळे त्याने लोकांची मने जिंकून घेतली. या सोहळ्यामध्ये रणदीपबरोबरच वधू लिन लैश्रामही लक्ष वेधून घेत होती. विशेषत: दोघांच्या लग्नाच्या पोशाखांमुळे सोहळ्याला पारंपरिक देखणेपण मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. त्यामुळेच आता हा नवा ट्रेंड सेट होऊ शकतो. या जोडप्याने मणिपुरी पद्धतीनुसार लग्न केले. मणिपूरमधील इंफाळ येथे पारंपरिक मेईतेई रिती-रिवाजांनुसार हा सोहळा संपन्न झाला. वधू लिनने संपूर्णत: मणिपुरी नववधूंचा पारंपरिक पोशाख असणारा ‘पोलाई’ परिधान केला होता. पोलाई सहसा नववधूच परिधान करतात. हा एक दंडगोलाकार स्कर्ट असून जाड कापड आणि बांबूने बनवलेला असतो. सॅटीनचे कापड आणि इतर अलंकारांनी तो सजलेला जातो. लिनच्या पोशाखाबद्दल बोलायचे झाल्यास तिने भरतकाम केलेल्या काळ्या ब्लाउज (याला सिल्क फ्युरिट म्हणतात)सह मरून रंगाचा पोलाई घातला होता. तिच्या हातात सुंदर फुले दिसत होती. लिनच्या पोलाई ड्रेसवर तळाशी सोन्याच्या जरीचे काम तसेच चांदीच्या धाग्यांनी केलेले नाजूक नक्षीकाम लक्षवेधी होते. लेयर्ड नेकपीस, बांगड्या, कडे, हातफूल, लेयर्ड टियारा, जड कानातले, मांग-टिक आणि मुकुट यांनी तिच्या लूकमध्ये मोलाची भर घातली होती. बेस मेकअप आणि मरून लिप शेडसह तिने वेडिंग लूक पूर्ण केला होता.

एकीकडे वधू अशी सजलेली असताना रणदीपदेखील आपल्या खास दिवसासाठी निगुतीने तयार झाल्याचे दिसत होते. त्यानेही पारंपरिक मणिपुरी वस्त्रपरंपरेनुसार तयार केलेला पांढरा कुर्ता, कॉटनचे धोतर आणि कॉटन शॉल असा पेहराव केला होता. याशिवाय त्याने डोक्यावर पारंपरिक पगडी (कोकित) घातली होती. कपाळाला चंदनाचा टिळाही लावला. पारंपरिक लूकमधल्या त्याच्या या छबीला सोशल मीडियावर फॅन्सकडून भरभरून लाईक्स मिळाले. लिन आणि रणदीपचा रिसेप्शनचा व्हीडिओही विशेष गाजला. एकंदरच, विवाह सोहळ्यातील लूक ठरवताना आजची तरुणाई कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांसारख्या आवडत्या सेलिब्रिटींच्या विवाह सोहळ्यांवर किंवा विराट आणि अनुष्काच्या आयकॉनिक युनियनवर नक्कीच डबल-टॅप करताना दिसते. ही स्थिती भारतीय लग्नाचा ट्रेंड किती विकसित झाला आहे याचे दर्शन देऊन जाते. या बदलत्या मानसिकतेमुळेच देशातील लग्नसोहळ्यामध्ये सध्या विलक्षण परिवर्तन बघायला मिळत आहे. त्यावर भारतीय संस्कृतीप्रमाणेच जागतिक संस्कृती, चित्रपट, सेलिब्रिटी विवाह आणि तांत्रिक प्रगती यांचा प्रभाव अगदी स्पष्टपणे बघायला मिळतोय. त्यामुळेच जवळपास १५ देशांमधील २५ हजारपेक्षा अधिक उद्योजक, ड्रेस डिझायनर्स, मेकअप आर्टिस्ट वा अन्य कौशल्य प्राप्त असणारे भारतीय विवाहक्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. नवीन युगातील भारतीय लग्नाच्या लँडस्केपला वैविध्यपूर्ण आकार देत असून त्यातून परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण प्रतिबिंबित होत असल्यामुळे अनेकांसाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

अगदी काही वर्षांपर्यंत भारतीय विवाह सोहळ्याचे स्वरूप छोटेखानी असायचे. हॉल अथवा एखाद्या मंगल कार्यालयात तो साजरा होत असे. तेव्हा उपस्थितांची संख्या जास्त होती, मात्र स्वरुप साधे दिसायचे. सध्या पाहुण्यांच्या याद्या कमी करत जोडपी या सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभव घेण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच फार्म हाऊस आणि लॉन्ससारखी विवाहस्थळे लोकप्रिय होत आहेत. २०२२ मध्ये तब्बल ५६ टक्के भारतीयांनी विवाह सोहळ्यासाठी बँक्वेट हॉलची निवड केल्याचे एक आकडेवारी सांगते. अशा इव्हेंट्स सर्व प्रकारच्या, थोडक्यात सर्वसमावेशक सेवा प्रदान करतात. म्हणूनच तेथे पार पडणाऱ्या सोहळ्यांना भव्यतेचा अतिरिक्त स्पर्श मिळताना दिसतो. भारतीय विवाह सोहळा अधिक देखणा करणाऱ्या आणखी एका बाबीचा विचार करताना जोडप्यांच्या एकत्रित नृत्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. केवळ जोडपेच नव्हे तर त्यांचे माता-पिता आणि मित्रपरिवार तसेच जवळचे नातलगही एकत्र नृत्याचा आनंद लुटतात. त्यामुळेच आता लग्नाचे नृत्यदिग्दर्शन हेदेखील चांगले करिअर म्हणून उदयास आले आहे. अशा प्रकारच्या नृत्यामुळे समारंभांमध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण होते; खेरीज उपस्थितांचे मनोरंजनही होते. आज अनेक भारतीय जोडपी लग्नादरम्यान ‘फर्स्ट डान्स’चा ट्रेंड स्वीकारत असून हा खास दिवस अधिक खास करताना दिसत आहेत.

हॉलीवूड-बॉलीवूड चित्रपट आणि सेलिब्रिटी विवाहांमुळे प्रभावित झालेली काही जोडपी पारंपरिक संध्याकाळ ते सकाळच्या उत्सवकाळातून बाहेर पडत दिवसा समारंभ पार पाडत असल्याचा बदलही नोंद घेण्याजोगा ठरत आहे. वेळेतील या बदलामुळे अधिक आरामशीर वातावरण निर्माण होते. अतिथी सोहळ्याचा पूर्णपणे आनंद लुटू शकतात. यामुळे व्यावसायिक फोटोग्राफी सेवांच्या मागणीमध्येही वाढ झाली असून ८३ टक्के जोडप्यांनी नयनरम्य पार्श्वभूमीवरील आनंदक्षण कॅप्चर करण्यासाठी छायाचित्रकारांची मदत घेतल्याचे दिसून आले आहे. जागतिक पाककृतींपासून प्रेरित होऊन आता भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये केटरिंग फॉरमॅटमध्येही बदल होत आहेत. युरोपियन शैलीतील टेबल सेट-अप अनेकांना आकर्षित करत आहे. विशेषत: जवळचे कुटुंबीय आणि मित्रांसह समारंभ साजरा करणाऱ्यांकडून या संकल्पनेला खूप मागणी मिळत आहे. हा ट्रेंड पाहुण्यांना जेवणाचे अनोखे अनुभव देण्याची इच्छा दर्शवतो. जेवणामध्येही आता जागतिक अन्नपदार्थांची भर पडत असून देशोदेशीचे पदार्थ उपस्थितांच्या पसंतीस उतरत आहेत.

केवळ विवाह सोहळा वा त्याच्याशी संबंधित समारंभांमध्येच नव्हे तर विवाहविषयक मानसिकतेमध्येही महत्त्वपूर्ण बदल अनुभवायला मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक प्रवाहांच्या प्रभावामुळे १५ टक्के शहरी भारतीय जोडप्यांनी लग्नापूर्वी एकत्र राहण्याचा पर्याय निवडला असल्याचे एक सर्वेक्षण सांगते. फ्रान्स आणि स्पेनसारख्या देशांच्या तुलनेत ही प्रथा भारतात अजूनही नवजात असली तरी सामाजिक अपेक्षांमध्ये बदल आणि लग्नगाठ बांधण्यापूर्वी परस्परांमध्ये मजबूत बंध निर्माण करण्याच्या विचाराची महत्त्वाची ओळख दर्शवते. जाणवणारा दुसरा एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता सोशल मीडियाद्वारे लग्नाच्या घोषणा करण्याचे प्रमाण वाढले आहे. यूएस आणि यूकेच्या पावलावर पाऊल ठेवत अंदाजे ५७ टक्के भारतीय आता सर्वव्यापी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत असून व्हॉट्स ॲपसारख्या अॅप्सद्वारे एकमेकांशी कटिबद्धता जाहीर करत लग्नाच्या घोषणा शेअर करण्यास प्राधान्य देताना दिसतात. ही बाब डिजिटल शिफ्टिंग आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व दाखवून देतेच, खेरीज मित्र आणि कुटुंबीयांच्या विस्तृत नेटवर्कपर्यंत पोहोचण्यासाठी मिळत असलेल्या सोयींची उपयुक्तताही ती अधोरेखित करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -