Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीपतंग उडवताना सावधानता बाळगा

पतंग उडवताना सावधानता बाळगा

महावितरणचे आवाहन

नाशिक : मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघू दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहेत. संक्रांतीनिमित्त पतंग विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये, मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करीत पतंग उडविताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघू व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरले असते. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन त्यामुळे वीजपुरवठा खंडित होवू शकतो.

प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे कुठलाच मांजा वापरू नये, नागरिक आणि लहान मुलांनी वीज वाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे व सोबत राहावे.

वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वादळ, वारा व पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सतर्कता व सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता तसेच संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या कार्यालयाशी किंवा तसेच महावितरणच्या २४/७ सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १९१२, १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -