Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीAyodhya Ram Mandir: राम मंदिर निर्माणानंतरची अयोध्येत पहिलीच रामनवमी; सूर्यकिरणांनी होणार रामलल्लावर...

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर निर्माणानंतरची अयोध्येत पहिलीच रामनवमी; सूर्यकिरणांनी होणार रामलल्लावर अभिषेक

भव्य सोहळ्याची जोरदार तयारी

मुंबई : यंदाच्या रामनवमीची जगभरातल्या रामभक्तांना प्रतीक्षा आहे. ५०० वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असणार आहे. त्यामुळे मनीध्यानी रामाचा जप करत अयोध्येमध्ये येण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर झाले आहेत. रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक हे यंदाच्या रामनवमीचे सगळ्यात मोठे आकर्षण असेल.

रामनवमीच्या दिवशी दि. १७ एप्रिल रोजी, मध्यान्ही, दुपारी १२ वाजता, साधारणपणे चार मिनिटे रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे.

रामलल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक ७५ एमएम व्यासाचा असेल. या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत होते. रामजन्माच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामलल्लाचा अभिषेक व्हावा, अशी इच्छा मंदिर निर्माणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली होती. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभारताना या अभिषेकासाठी बांधकाम तज्ज्ञांनी विशेष स्वरूपाची रचना केली.

अयोध्येतल्या राम मंदिरातला किरणोत्सव हा कोल्हापूरमधील अंबाबाईच्या मंदिरापेक्षा थोडासा वेगळा असेल.
अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे कोणत्याही दरवाजातून किरणे येणार नाहीत तर ती घुमटातून येतील. कारण भगवान रामाचा जन्म अयोध्येत मध्यान्हाची वेळी झाला. यावेळी सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो. त्यामुळे मंदिरात जिथे रामलल्ला विराजमान आहेत. तिथल्या घुमटावर गवाक्षासारखी रचना करण्यात आली आहे आणि याच गवाक्षातून एका विशेष सिस्टिमच्या माध्यमातून मध्यान्हीची किरणे गाभाऱ्यात येत रामलल्लाचे तेज वाढवतील.

प्रभू श्रीरामांवर होणार सूर्यकिरणांचा अभिषेक

घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला आहे. या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेस सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यातील सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेली आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणे छतावरच्या रिफ्लेक्टवर पडतील. तिथून ही किरणे पहिल्या आरशावर परावर्तीत केली जातील आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणे पोहोचतील थेट गाभाऱ्यात रामलल्ला समोर बसवलेल्या दर्पणापर्यंत. हा आरसा रामलल्लापासून साठ अंशांच्या कोनात ठेवला गेला आहे.

भाविकांसाठी १०० एलईडी स्क्रीन

रामलल्लावर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. तर अयोध्येतल्या भाविकांना हा सोहळा पाहता यावा यासाठी १०० एलईडी स्क्रीन लावले जातील. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली जाणार आहे. साधारणपणे १० ते १५ लाख भाविक दर्शनाला येतील असाही अंदाज लावण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -