Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रतक्रार देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ?

तक्रार देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ?

चौथ्या दिवशीही एफआयआर दाखल नाही

वाडा (वार्ताहर) : श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ वज्रेश्वरी न्यू इंग्लिश स्कुलचे तांदूळ काळाबाजारात विकताना १२ जून रोजी पकडले. कार्यकर्त्यांनी हे तांदूळ पोलिसांच्या ताब्यात देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कळवले. पोलिसांना लेखी पत्र देखील दिले. मात्र ४ दिवसानंतर देखील याबाबत एफआयआर दाखल झालेली नाही. संबंधित अधिकारी या भ्रष्ट विश्वस्त आणि संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा संशय येत आहे, असा आरोप श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी केला आहे.

श्रमजीवी संघटनेच्या प्रमोद पवार, आशा भोईर, नारायण जोशी, नवनाथ भोये आदी कार्यकर्त्यांनी गुरूवारी पत्रकारांसोबत याच संस्थेच्या रेणुका विद्यालय झिडके येथे भेट दिली. या शाळेतील पोषण आहारातील डाळ आणि चणे त्याच होलसेल व्यापाऱ्याला विकले असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. याबाबत शाळेत दप्तर तपासले असता रेकॉर्डच गायब असल्याचे कळले, तसे लेखी येथील नवनियुक्त मुख्याध्यापक व्ही के पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांनी घेतले.

शाळेच्या पोषण आहाराचा उघड अपहार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आहे असा संशय यावरून बळावला आहे. तांदूळ पकडल्यानंतर संशयित विश्वस्त अरुण पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे. मात्र फौजदारी कारवाईचे काय असा सवाल विचारला जात आहे. पोलिसांनी त्याच दिवशी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला असताना अजूनही अधिकारी फिर्याद देण्यासाठी येत नाही हा अपहाराला पाठिंबा देण्याचा प्रकार असल्याचा आरोप प्रमोद पवार यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -