Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीपोक्सो कायद्या संदर्भातला आदेश त्वरीत मागे घ्या -चित्रा वाघ

पोक्सो कायद्या संदर्भातला आदेश त्वरीत मागे घ्या -चित्रा वाघ

मुंबई (हिं.स.) : पोक्सो कायद्यानुसार तक्रार नोंदविण्याआधी त्या तक्रारीची शहानिशा करण्याचा मुंबई पोलिस आयुक्तांनी काढलेला आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरूवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ यांनी सांगितले की, पोक्सो कायद्यानुसार अथवा विनयभंगाची तक्रार नोंदवून घेण्यापूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त, उपायुक्त घटनेची शहानिशा करतील त्यानंतर हे अधिकारी तक्रार दाखल करून घ्यायची की नाही, याचा निर्णय घेतील, अशा आशयाचा कार्यालयीन आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी ६ जून रोजी काढलेला आहे. हा आदेश अत्यंत चुकीचा, अन्यायकारक असून महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारची उदासीनता दाखवणारा आहे.

राज्यभरात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबई पोलिस आयुक्तांनी काढलेला आदेश महिलांवरील अत्याचारांना प्रोत्साहन देणारा आहे. मुळात पोक्सो कायदा हा संसदेने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा अबाधित ठेवलेला आहे. अशा या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करताना पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावरच गुन्हा दाखल केला जाईल अशी अट घालण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांना नाही.

मुळात पोलिस आयुक्तांनी कोणत्या कलमांखाली, कायद्या अंतर्गत आणि अधिकाराने हा आदेश काढला आहे याचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, या कायद्याचा वापर करून महिलांकडून खोट्या तक्रारी दाखल केले जात असतील तर त्याविरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची सोय कायद्यात आहे. पोलिसांनी त्याचा उपयोग करून अशा घटनांना प्रतिबंध करावा. पण असा आदेश काढण्याचा त्यांना कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही.

राज्याचे गृहमंत्री हे कायद्याचे अभ्यासक असून त्यांनीही या आदेशाला विरोध केलेला नाही. आदेश निघून दहा दिवस झाले तरी मुख्यमंत्री अथवा अन्य कोणीही या आदेशाबाबत अवाक्षरही काढलेले नाही, यावरून या सरकारला महिला सुरक्षेविषयी किती गांभीर्य आहे, हेच दिसते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -