Monday, May 20, 2024
Homeकोकणरायगडनागोठणेपासून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात

नागोठणेपासून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात

रायगड प्रेस क्लबने पुकारलेले महामार्गाचे आंदोलन स्थगित

महाड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या रखडलेल्या कामाबाबत आणि कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत पडलेले खड्डे भरून डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा १ मे रोजी रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे पत्र नॅशनल हायवे यांना दिले होते. दरम्यान, नागोठणेपासून डांबरीकरणाच्या कामाला शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, या टप्प्याचे काँक्रिटीकरणाचे कामही मे महिन्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट मॅनेजर यशवंत घोटकर यांनी प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांना दिले असल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती खांबे यांनी दिली आहे.

कासू ते इंदापूर या टप्प्यातील रस्त्याची अनेक ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था आहे़ नागोठणे ते पळस-कोलेटी दरम्यान वाहन हाकणे जिकरीचे होते, या रस्त्याची एकबाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असल्याने वाहन चालक हे विरुद्ध मार्गिकेने वाहने हाकतात, त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले, परंतु ज्याठिकाणी रस्ता चांगला आहे त्या शिरढोण, पनवेल येथे कामाला सुरुवात झाली़ उद्ध्वस्त झालेल्या कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याचे काम आधी करणे गरजेचे असताना या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले होते़ रायगड जिल्हा प्रेस क्लबने आंदोलनाचा इशारा देऊन नागोठणे बाजूने काम सुरू करावे, यासाठी हायवे प्राधिकरणाकडे तगादा लावला होता.

नागोठणे कासूपासून खड्डे पडलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे, तसेच काँक्रीटीकरणाच्या मशिनरीही सुकेळी खिंडीमध्ये आणून ठेवल्या असून, पहूर येते कॉरीचे काम सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे कॉंक्रिटीकरणाचे कामही लवकरच सुरू होईल आणि हे काम पावसाळ्यातही सुरू राहील, अशी माहिती घोटकर यांनी दिली. डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने सोमवारी १ मेपासून रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिली.

तब्बल तेरा वर्ष रखडलेल्या या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा रायगड प्रेस क्लबच्या वतीने रस्त्यावर उतरून पत्रकारांनी आंदोलने केली आहेत. यावेळेसही १ मे रोजी हे लॉंग मार्च सह घंटानाद आंदोलन करण्यात येणार होते, मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -