Sunday, May 19, 2024
Homeमहामुंबईपालिका शाळांतील विद्यार्थी करणार भाजीपाल्याची शेती

पालिका शाळांतील विद्यार्थी करणार भाजीपाल्याची शेती

भाजीपाल्याचा वापर मध्यान्ह भोजनासाठी

मुंबई (प्रतिनिधी) : माटुंगा येथील वाघजी केब्रिज शाळेसह चेंबूरमधील शाळांत शहरी शेती अंतर्गत छतावरील शेती अर्थात रुफ गार्डनिंगची संकल्पना राबवण्यात आली. आता ही संकल्पना महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये राबवण्याचा मानस असून या शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनांमध्ये करण्याचा विचार महापालिका शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थी आता स्वत: भाजी पिकवून स्वत:च्या मध्यान्ह भोजनाची सोय करणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

पर्यावरणीय बदलांबाबतचे शिक्षण हे केवळ पुस्तकी मर्यादित न ठेवता या शिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात वापर करण्यासाठीचे धडे गिरवत महानगरपालिकेच्या माटुंग्यातील एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या १५४ मुलांच्या सहभागातूनच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीची संकल्पना राबवण्यात आली. त्यासोबतच शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. वाघजी शाळेप्रमाणे चेंबूर कलेक्टर शाळेतही अशा प्रकारच्या शहरी शेतीचा प्रकल्प राबवण्यात आला. या दोन्ही शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या २५० शालेय इमारतींमध्ये शहरी शेती उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे ६०० ते ७०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आहे.

मुलांना शेतीविषयक कामांमध्ये आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून शेतीसारख्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे हाही प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेचा निधी खर्च केला जाणार नसून यासाठी आवश्यक असणारा निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -