Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेराजकीय पक्षातील संभाव्य उमेदवारांनी तलवारी केल्या म्यान

राजकीय पक्षातील संभाव्य उमेदवारांनी तलवारी केल्या म्यान

मातब्बरांसह नवोदित इच्छुकांचा हिरमोड

ठाणे : सत्तासंघर्षात अडकलेल्या राजकीय तिढ्यामुळे निवडणुकांसाठी गुढग्याला बाशिंग लावून बसलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीचा सूर्य नजीकच्या काळात उजाडणार नसल्याने त्यांच्या राजकीय प्रवासात अंधार दाटला आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर राज्यातील संघर्षाचा तिढा सुटेल, असे वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या हातात चेंडू टोलवत निर्णय देण्यास सांगितले. तो निर्णय जेव्हा येईल, तेव्हा येईल. मात्र ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणाच्या निकालात अडकलेल्या नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाही पावसाळ्यानंतरच होतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या मातब्बरांचा आणि नव्याने तयार असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महानगरपालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर या नगर परिषदांच्या निवडणुका दीड वर्ष झाले तरी अधांतरीच आहेत. त्या त्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून पाऊल ठेवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. निवडणूक लागण्याच्या आधीपासूनच इच्छुक उमेदवार पुन्हा राजकीय नशीब आजमाविण्यासाठी तयारीत आहेत, तर नवीन इच्छुकांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती. त्यासाठी संबंधितांनी वॉर्डा-वॉर्डात, गावागावांत खर्च करण्यात सुरुवात केली होती. निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांनी जीवाचे रान करून मतदारांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांसमोर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, तर अनेकजण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवणीच्या तयारीत आहेत. काही मंडळींनी तर विविध उपक्रम राबवण्यासही सुरुवात केली होती. आपण वरिष्ठांच्या मर्जीतील आहोत, त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळणार असेच सर्वच पक्षातील इच्छुकांना वाटत असल्याने गुलाल आपल्याच अंगावर पडणार, असा भाव
आणत होते.
सोशल मीडियाचा वापर करत कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करणे तसेच प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर काही उच्चशिक्षित इच्छुकांनी भर देत संपर्क वाढविण्यास सुरुवात केली होती; परंतु जसजशी निवडणूक लांबणीवर पडल्याचे लक्षात येऊ लागल्यावर अनेकांनी सुरू केलेल्या तयारीवर आणि नियोजनावर पाणी पडले, तर काहींनी निवडणुकीचा अंदाज घेऊन खर्चावरील हात आखडता घेतला असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येते.

आरक्षण बदलणार की तेच राहणार?
याबरोबरच पहिले जे आरक्षण निघाले होते, त्यावर बदल तर होणार नाही ना, या धास्तीने काहींनी मैदान सोडल्यात जमा आहे. आता फक्त वाट पाहायची की निवडणुका कधी लागतात आणि आरक्षण बदलते की तेच राहते. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याने आपले काय, असा प्रश्न इच्छुकांसमोर आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची तलवार म्यान केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -