Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे!’

अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे!’

श्रीनिवास बेलसरे

पूर्वी रेडिओ हे देशाची संस्कृती टिकवणारे, संस्कृतीचे संवर्धन करतानाच आधुनिक मूल्ये रुजवणारे, वैज्ञानिक माहिती देऊन लोकांचे प्रबोधन करणारे आणि मनोरंजनाबरोबर लोकांच्या भावविश्वाची जपणूक करणारे फार प्रभावी माध्यम होते.
सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत आकाशवाणीचा ज्ञानयज्ञ सुरू असायचा. त्या काळी समाजातील सर्व वर्गांच्या सर्व गरजा पुरवत असल्याने लोकजीवनात आकाशवाणीला अनन्यसाधारण महत्त्व होते. आकाशवाणीवर जसे शालेय शिक्षणाचे उत्तम कार्यक्रम असत तसेच लोकगीतांचे अगदी लावणीपर्यंतचे कार्यक्रम वाजवले जात. सकाळी ११ वाजता लागणारी पुणे केंद्राची ‘कामगार सभा’ हा खरे तर ‘पॉप संगीताचा’ (पॉप्युलर या अर्थाने) कार्यक्रम होता!

सायंकाळी धनगर समाजाची लोकगीते लावली जात. प्रत्येक सणावाराला त्याचे महत्त्व रंजकतेने मांडणारे कार्यक्रम, खास महिलांसाठी त्यांच्या सोयीच्या वेळी ठेवलेले कार्यक्रम, मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांच्यावर चांगले संस्कार करणारे कार्यक्रम आकाशवाणी प्रसारित करायची. रा. ९.३० वाजता ‘नभोनाट्य’ म्हणून सुंदर नाटकेही सादर होत. साहित्यिक अभिरुची जपणारे कार्यक्रम होते तसेच सकाळच्या मंगल वेळी भक्तिसंगीतही ऐकवले जाई. दर शुक्रवारी गांधीजींच्या विचारांवरचा एक कार्यक्रम असायचा. त्याच्या शेवटी हमखास एखादा अभंग लावला जाई.

एकंदर सर्वच बाबतीत परिपूर्ण असा अनेक पिढ्यांवर झालेला आकाशवाणी हा एक सामाजिक संस्कार होता! आता खासगी रेडिओचे रात्री उशिराचे काही कार्यक्रम तर धक्का बसावा इतके प्रक्षोभक आणि तरुण पिढीला बिघडवण्यासाठीच योजले आहेत, असे वाटावे इतके थिल्लर असतात. आकाशवाणी मात्र स्वत:चा मोठा डौल सांभाळत, अतिशय जबाबदारीने वागणारी जणू घरातीलच एक लाडकी व्यक्ती होती!
भक्तिसंगीतात कधी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले एक भजन लावले जायचे. संत सोहिरा महाराजांचा, अाध्यात्मिक आणि व्यावहारिक ज्ञान केवळ ४ कडव्यांत देणारा, तो एक सुंदर अभंग होता. भारतीय अाध्यात्मातील अद्वैत परंपरा हे तसे गूढ तत्त्वज्ञान! सोहिरा महाराजांनी ते दोन ओळींत सोपे करून टाकले होते. या अभंगाची महती तशी आजही कमी झालेली नाही. मात्र आता एकंदर जीवन टोकाचे भौतिकवादी बनल्याने किती जणांना तो आवडेल, हे सांगणे कठीण!

‘जीव’ आणि ‘शिव’ यातील भेद हा केवळ आभास आहे. अंधारात माणूस दोरीलाच साप समजून घाबरतो तसे अंतिम सत्याचेही आहे, अशी संत सोहिरा यांची मांडणी आहे –
हरिभजनाविण काळ घालवू नको रे…
दोरीच्या सापा भिवुनी भवा। भेटी नाही जिवा-शिवा।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे…
माणसाकडे विवेक नावाचा तराजू आहे, तोवर त्याचा व्यवहार चुकत नाही हे ठसविण्यासाठी संत म्हणतात, विचार, उच्चार आणि आचार हा विवेकावर आधारलेला असावा. बोलण्यात आणि वागण्यात विवेकच आपला खरा मार्गदर्शक होऊ शकतो. याउलट माणूस अनेकदा मनाला स्वाभाविकपणे जाणवणारे सत्य न स्वीकारता तर्कवितर्क करत बसतो. स्वार्थ, वासनाविकार यांच्या आहारी जाऊन आपल्या दुर्वर्तनाचे समर्थन करतो. मग त्याला योग्य गोष्टही चुकीची आणि अयोग्य गोष्टही बरोबर वाटू लागते! यावर सोहिराबुवा म्हणतात, मनात उगीच विचारांचा चिखल कालवत बसू नकोस –

विवेकाची ठरेल ओल। ऐसे की बोलावे बोल।
आपुल्या मते उगीच चिखल, कालवू नको रे…
संत माणसाला सद्विचार आणि सदाचाराची शिकवण देत असतात. संतांची वैचारिक चळवळ सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे कर्मकांडाला, अंधश्रद्धेला महत्त्व होते. अनेक वाईट गोष्टींना शास्त्राचा आधार सांगून त्या समाजाच्या माथी मारल्या जात. भाबड्या लोकांना फसवले जाई.
मात्र, संतानी आपल्या लेखनातून, कीर्तनातून फक्त सत्याला आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याला महत्त्व दिले. त्यांनी सत्यालाच आपला गुरू मानावे, असे सांगितले! संत म्हणतात, आपल्या नैतिक, अाध्यात्मिक उन्नतीसाठी तसे वर्तन असलेला आदर्श आपल्याजवळ हवा. म्हणून ‘तू सतत संतांच्या संगतीत राहा.’ पांडित्याच्या आहारी न जाता प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कुणाच्याही आहारी जाऊ नकोस.
संत संगतीने उमज। आणुनि मनी पुरते समज।

अनुभवावीण मान हालवू नको रे…
शेवटी सोहिरा महाराज उपदेश करतानाच एक अाध्यात्मिक सत्य मांडतात. आत्मा अमर आहे आणि शरीर संपल्यावरही तो ज्ञानेद्रियांशिवाय ज्ञान मिळवू शकतो. त्यालाच ‘अतिंद्रिय अनुभूती’ अर्थात ‘एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन’ म्हणतात. संताचे हे प्रतिपादन अमेरिकेत झालेल्या संशोधनाशी संपूर्णत: जुळते! जे लोक अपघातात जवळजवळ मृत झाले होते किंवा कोमात होते. बरे झालेल्यांना ‘त्या काळातील’ अनुभवांना
एनडीई म्हणजे ‘निअर डेथ एक्स्पिरियंस’ म्हणतात. अशा लोकांच्या अतिंद्रिय अनुभवावर विपुल संशोधन झाले आहे. त्यांनी स्वत:च्या ‘जाणिवेला’ शरीराबाहेर पडताना अनुभवले. दवाखान्यातील इतर ठिकाणी चाललेले नातेवाइकांचे बोलणे नंतर शब्दश: ऐकवले. शस्त्रक्रिया सुरू असताना थिएटरमधील लोक काय बोलत होते. केवळ तेच सांगितले नाही, तर डॉक्टर/नर्सेस यांच्या मनात त्या वेळी आलेले विचारही सांगितले! आणि इथेच संत सोहिरा महाराजांचा विचार कसा चपखल बसतो पाहा –

ते म्हणतात, जगाच्या पलीकडे गेल्यावर माणसाचा अनुभव भौतिक नसतो, कारण शरीर तर जळून गेलेले असते. त्याला पृथ्वी, तिच्याजवळचा चंद्र, सूर्य यांची गरज राहात नाही. आजूबाजूचे ज्ञान मिळवण्यासाठी त्याच्याकडे ज्ञानेंद्रिये नसतात. तरीही आत्म्याच्या आत सतत तेवत असलेली ज्ञानाची ज्योत त्याला प्रबुद्ध करते. त्या ‘पलीकडच्या जगात’ रात्रही नसते आणि दिवसही नसतो. असतो तो अंतिम ज्ञानाचा शीतल प्रकाश! म्हणूनच माणसाने अंतरीच्या ज्ञानज्योतीची आस धरावी,
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती। तेथ कैचि दिवसराती।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे।।
कधी जुन्या समृद्ध काळाची आठवण झाली, तर अशी गाणीही खूप आनंद देतात. मनाला वेगळ्याच पातळीवर नेतात. म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -