Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआंगणेवाडीची भराडीदेवी जत्रा

आंगणेवाडीची भराडीदेवी जत्रा

कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी काही हजारोंच्या संख्येत भरणाऱ्या या जत्रेला लाखो भाविकांची गर्दी जमू लागली आहे. यावर्षी
४ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडीची यात्रा संपन्न होत आहे. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर व आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खासगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दर वर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी; परंतु गेल्या ५-२५ वर्षांत तिला स्वरूप आले आहे, ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखे.
सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी, अशी तिची ख्याती फक्त कोकणातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे. या सर्व ठिकाणचे भाविक अतिशय आतुरतेने या जत्रोत्सवाची वाट पाहत असतात. ही यात्रा दोन दिवस चालते. मुंबई हा कोकणचा श्वास आहे. त्याला एकमेकांपासून वेगळे काढता येणार नाही. इतके घट्ट अनुबंध मालवणी माणसाचे मुंबईशी जुळले आहेत. गिरणीतली नोकरी होती, तेव्हा आणि आता त्याच गिरणीबाबूंची मुलं कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करीत असतानाही कोकणच्या लाल मातीची ओढ त्या मुलांनाही स्वस्थ बसू देत नाही. हे कोकणप्रेम राजकारण्यांनी चांगलंच हेरून त्याचा वेळोवेळी राजकीय फायदा उठविला आहे. आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्तानं हे “कनेक्शन” जपण्याचा प्रयत्न आता सगळेच राजकीय पक्ष करतात. निवडणुकीच्या मोसमात नेते आपल्या उमेदवारांना घेऊन आंगणेवाडीला जातात. त्यानिमित्ताने नवस वगैरे बोलले जातात.

देवीच्या उपकाराची परतफेड

निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेला राजकीय कार्यकर्ता गेला आणि आल्यानंतर त्याला तिकीट मिळाले, अशी उदाहरणं मुंबईतील अनेक नगरसेवक, आमदार खुलेपणानं सांगतात. सामान्य माणसांच्या प्रतिक्रियाही यापेक्षा वेगळ्या नाहीत. देवीला नवस केला आणि काम झाले. त्यामुळे देवीच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी दर वर्षी नित्यनेमानं आंगणेवाडीची वारी करणारेही कमी नाहीत. मुंबईतील मूळ आंगणेवाडीकर तर जत्रेसाठी चांगली १५ दिवसांची सुट्टी टाकूनच बायको-मुलाबाळांसकट गावाला धाव घेतात. गावची जत्रा, त्याला मिळालेली प्रतिष्ठा जपण्याचा हेतू यामागे असतोच. त्यापेक्षा खच्चून भरलेल्या लोकल आणि बसमध्ये लोंबकळण्याच्या जगण्यातील संघर्षाला वाट करून देण्यासाठी देवीच्या चरणाची लागलेली आस म्हणा किंवा श्रद्धाही यामागे दडलेली असते.

जत्रेला उसळणारी लाखोंची गर्दी हे नास्तिकांना नसते उपद्‌व्याप वाटतील. एकाला वाटणारी श्रद्धा ही दुसऱ्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा ठरण्याची शक्यताही तितकीच. असं असलं तरी माणसांच्या श्रद्धेला काही अंत नाही; ती अमर आहे, हेही मान्य करायलाच हवं. दिवसेंदिवस जत्रेला वाढणारी गर्दी माणसांना सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा अनेक अंगांनी अधिकाधिक असुरक्षित वाटते. म्हणूनच वाढता वाढता वाढतेच आहे, म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

भराडी देवीचे माहात्म्य

मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री भराडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. ‘भरड’ भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात.

तांदळाच्या वड्याचा प्रसाद
या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते की, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर? अशी भीती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहीत. असे या नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. सामन्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कौल लावून शिकारीला जातात. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही. जेव्हा शिकार मिळते व तिचे ग्रामभोजन होते त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन, चर्चा करून जत्रोत्सवाचा दिवस निश्चित केला जातो.
कौल आणि अवसार

देवदिवाळी ते जत्रेनंतर प्रसाद वाटेपर्यंत आणि वेळ पडल्यास होळीपर्यंत देवीला कौल लागत नाही. कौल लावण्यासाठी तांदूळ (अक्षता) वापरले जातात. कौल फक्तदेवीच्या कार्यासाठीच लावला जातो. हा अवसार वर्षातून दोनदा येतो आणि एक ते दीड मिनिटेच असतो. जत्रेच्या पहाटे जत्रा मान्य झाल्याचे सांगून निघून जातो.

सूर्याची किरणे अन् यात्रेचा प्रारंभ
निसर्गसमृद्ध कोकणातील विविध मंदिरे आणि त्या भोवतीचा परिसर विलोभनीय आहे. यातली अनेक मंदिरे वा देवस्थाने जागृत देवस्थाने म्हणूनही ओळखली जातात. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडीचं भराडीदेवीचं मंदिर आणि तिथली जत्रा यासाठीच प्रसिद्ध आहे. या जत्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेची तारीख. ही तारीख सर्वांच्या संमतीनं ठरवली जाते आणि ती इतरांना कळविणे हा एक आगळा अनुभव आहे. दर वर्षी फेब्रुवारीत भरणाऱ्या या जत्रेसाठी लाखो भाविक येतात. यामध्ये राजकारणी, सिनेअभिनेते, देशी-विदेशी पर्यटक यांचाही विशेषत्वानं समावेश आहे. यात्रेच्या दिवशी सूर्योदयानंतर नाभिक बांधव आरशाने सूर्याची किरणे देवीच्या मुखकमलावर पाडतो. तेव्हा प्रारंभीची पूजा होऊन जत्रेचा प्रारंभ होतो. जत्रेच्या दिवशी श्री भराडीदेवीच्या स्वयंभू पाषाणाला मुखवटा घालून साडी-चोळी नेसवली जाते. अलंकारही घातले जातात. सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असतो. सायंकाळी
८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू असतो. रात्री ९ वाजता हा कार्यक्रम बंद झाल्यावर आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील महिला स्नान करून कोणाशीही न बोलता जेवण करण्यास प्रारंभ करतात. हा प्रसाद रात्री देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. यालाच ताटे लावणे असे म्हणतात. या प्रसादात भात, भाजी, वडे, सांभार यांचा समावेश असतो. त्या महिलांसोबत आंगणे पुरुष मंडळी हातात पेटत्या मशाली घेऊन त्यांना गर्दीतून वाट दाखवत असतात.

ना पंचांगात, ना कॅलेंडरमध्ये
आंगणेवाडी जत्रेची तारीख कुठल्या पंचांगात वा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरविण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामे झाली की, आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच ‘डाळपस्वारी’ म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा दिवस ठरवतात. देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरविण्यासाठी पुन्हा ‘डाळपस्वारी’ होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो.

आंगणेवाडीचा स्कायवॉक लय भारी
महाराष्ट्रात आजघडीला असलेल्या जत्रेमध्ये या जत्रेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पाहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर, ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथं जागा मिळेल तिथं तिथं… प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख. जशी तारीख जवळ येते, तसा सुरू होतो तो खरा जल्लोष. आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भव्य असा मंडप उभारण्यात येतो. केवळ ग्रामस्थांचीच नाही, तर प्रशासनाची, एसटी महामंडळाची, सार्वजनिक बांधकाम खात्याची साऱ्यांचीच प्रचंड घाईगर्दी सुरू असते. कामाला तास कमी पडत असतात. नियोजन आणि मनुष्यसाठा जबरदस्त असतो. पण जत्रेत कसलीच कमतरता राहू नये, यासाठी अधिकाऱ्यांच्या मनातला आईचा भक्त सारखा धडपडत असतो. कधी विचार केलाय की जत्रेसाठी तीन दिवस राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना, बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि यांसारखे अनेकजण जे ड्युटीवर असतात त्यांना वाटत नसेल का? की आपणही सुट्टी टाकून फॅमिलीसह जावं जत्रेला… पण नाही, इथंही जिंकतो त्या प्रत्येकाच्या मनातला भक्त. कारण जत्रेला येणाऱ्या भक्ताची सेवा करणं हीच खरी आई भराडीची सेवा.

सोशल कनेक्टिव्हिटीचे शक्तिपीठ
जमाना फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा आहे. म्हणजे एकाने टाकलेली पोस्ट दुसऱ्याने लाइक किंवा शेअर करून हजारोजणांना कनेक्ट करावे असा फास्ट पिढीचा सुपरफास्ट जमाना आहे. कोकणातील सोशल कनेक्टिव्हिटीचे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडीदेवीची वार्षिक जत्रा थाटात संपन्न होते. राज्यातून लाखोंची गर्दी आणि करोडोंची उलाढाल असे वार्षिक गणित असणाऱ्या या जत्रेला आता महायात्रेचे स्वरूप आले आहे. आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसुरे गावची एक छोटीशी वाडी. या वाडीतील भराडीदेवीची वार्षिक जत्रा आता मुंबई-पुण्यातीलच नव्हे, तर देश-विदेशातील मालवणी माणसासाठी ‘न चुकवता येण्यासारखी’ बनली आहे. लाखो भाविक या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात, नवस करतात, पूर्ण झालेले नवस फेडतात. कोकणी माणूस हा देवभोळा. म्हणजे घरात बसलेला असताना कुठल्या तरी मंदिराचा घंटानाद कानावर पडला तरी ‘रवळनाथा सांबाळ रे बाबा’ अशी मनोमन साद घालणारा. या कोकणी माणसालाच भक्तीच्या एका धाग्यात गुंफून ठेवण्याचे काम आंगणेवाडीच्या जत्रेने केले आहे. सण, उत्सव हे माणसे जोडण्यासाठी असावेत असे लोकमान्य टिळक म्हणायचे. आंगणेवाडीची जत्रा हे त्याचे उदाहरण आहे.

निस्सीम श्रद्धा असणाऱ्यांचा जागरच
आंगणेवाडीची भराडी देवी नवसाला पावते, अशी भाविकांची अपार श्रद्धा आहे. म्हणूनच जत्रेच्या तारखेकडे मुंबईकर डोळे लावून बसलेले असतात. तारीख जाहीर झाली की सुट्टी टाकण्यापासून खासगी गाडी ठरविण्यापर्यंत आणि रेल्वेच्या तिकीट रांगेत सकाळीच जाऊन उभे राहण्यापर्यंतची धावपळ केली जाते. भराडीच्या जत्रेत एकजीव होतात, मातेचे दर्शन घेतात आणि आणि पुन्हा आपल्या रहाटगाड्यात परततात. ही जत्रा प्रत्येकालाच आपल्या देवीची जत्रा वाटत असते. म्हणूनच जत्रेची तारीख जाहीर झाली की, सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांवर मागे ‘आंगणेवाडी जत्रा अमूक अमूक तारखेला’ असा फलक लावला जातो. एसटीमध्येही कुणीतरी खडूने जत्रेची तारीख लिहितो. भराडीची महती अशी गावा-गावात, वाडी-वाडीत सर्वदूर पसरते आणि प्रत्येकजण शक्तिपीठाशी कनेक्ट होतो.

मुंबईत आंगणेवाडीची जत्रा ठाऊक नाही, असा माणूसच विरळा! कोकणी माणसाची जत्रा हे या जत्रेचं स्वरूप कालानुरूप पार बदलून गेलंय. कोकणी माणसाच्या उत्पादनांना मार्केट मिळवून देणारी बाजारपेठ, तर कुणासाठी वर्षानुवर्षांचा रिवाज आंगणेवाडीच्या या जत्रेसाठी मुंबईकर जथ्थ्याने येथे मनोभावे दर्शनासाठी येतात.

-सतीश पाटणकर

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -