Thursday, May 2, 2024
Homeदेशअमित शहा भेटले पंतप्रधान मोदींना

अमित शहा भेटले पंतप्रधान मोदींना

काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, उपाययोजनांची दिली माहिती

दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान गाठले आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर होत असलेले दहशतवादी हल्ले आणि तेथील सुरक्षेच्या मुद्द्यांवर ही चर्चा झाल्याचे समजते. तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर सुरक्षा यंत्रणांसोबत सोमवारी सहातासांहून अधिक काळ मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अंतर्गत सुरक्षेबाबत राज्यांमधील समन्वयावर भर दिला. छोट्या-छोट्या माहितीच्या आधारे खबरदारी घेत त्वरित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना यावेळी दिल्या.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सामन्या नागरिकांना लक्ष्य केले आहे. त्यात अल्पसंख्याक हिंदू आणि शिखांची हत्या करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना काश्मीरमधील ९० च्या दशकातील परिस्थिती पुन्हा निर्माण करायची आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन काश्मीरमधील परिस्थिती आणि उचललेल्या पावलांची माहिती दिली. काश्मीरमध्ये सुरक्षा एजन्सी मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधातील तपास आणि ऑपरेशन तीव्र करणार आहेत. दहशतवादी संघटना ह्या नव्या नावाने आणि छोट्या-छोट्या गटांमधून कार्यरत होऊन नागरिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावरील सर्व यंत्रणांना संशयितांची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गुप्तचर विभागाच्या (इंटेलिजन्स ब्युरो) मुख्यालयात ही राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद आयोजित करण्यात आली होती. सीमावर्ती भागात राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. वेळोवेळी उच्च अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठका घेतल्या पाहिजेत, असे अमित शहा यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय, गृह सचिव ए. के. भल्ला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, सीबीआय प्रमुखांसह सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख आणि केंद्रीय सुरक्षा दलांचे प्रमुख उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी अमित शहा यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

जम्मू -काश्मीरमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या दोन हत्यांची चौकशी एनआयए करेल. लाल बाजारात माखन लाल बिंद्रू आणि भेलपुरी विक्रेता वीरेंद्र पासवान यांच्या हत्येचा तपास एनआयए करेल. बिंद्रू हे काश्मिरी पंडित होते. तर पासवान हे बिहारचे मजूर होते.

‘तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा; राजौरी सेक्टरमध्ये चकमक

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या अन्य तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे. राजौरी सेक्टमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील तेव्हाच उत्तर द्यावे असा सल्ला स्थानिक कमांडर्सला देण्यात आल्याचे वृत्त आहे.

‘हे दहशतवादी जंगलामधून दोन – दोनच्या गटाने हल्ला करत असल्याने भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले. दोन – दोनच्या गटाने हल्ला केल्याने त्यांना भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करण्याची आणि नंतर वेगाने हलचाल करण्याची संधी मिळते’, असे एका भारतीय कमांडरने सांगितले.

गेल्या दोन – तीन महिन्यांमध्ये राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलांमधून श्रीनगरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या ९ ते १० दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केल्याची माहिती दिल्लीमधील साऊथ ब्लॉकने दिली आहे. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला. अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना जोर आला आहे. विशेष म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होईल आणि घुसखोरी वाढण्याची शक्यता आधीपासूनच असल्याने या भागांमध्ये भारताने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली आहे.

भारतीय लष्कर सध्या स्वत:हून हल्ला करण्याऐवजी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला घेराव घालून समोरुन एखादी हलचाल होण्याची वाट पाहतात. जंगलामध्ये युद्ध करताना धीर धरणे आणि विचारपूर्वक पद्धतीने हल्ला करणे फार महत्वाचे असते. असे केले तरच कमी प्रमाणात जिवीतहानी होते आणि दहशतवाद्यांचा खात्मा करणे अधिक सोयिस्कर होते असे एका कमांडरने सांगितले.

लष्कर प्रमुखांनी पूँछमध्ये घेतला आढावा

जम्मू-काश्मीरसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडूतूनही केंद्रीय यंत्रणांना दहशतवाद्यांची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात कंबर कसली आहे. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकंद नरवणे हे जम्मूत दाखल झाले आहेत. त्यांनी पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या आघाडीच्या चौक्यांवरील सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच जवानांशीही संवाद साधला. अधिकाऱ्यांनी त्यांना दहशतवादविरोधी मोहीमांची माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -