Monday, June 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअखिल भारतीय कविकट्टा आणि कवींचा सन्मान

अखिल भारतीय कविकट्टा आणि कवींचा सन्मान

फिरता फिरता – मेघना साने

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा घोषित झाल्या की, नवोदित तसेच प्रस्थापित कवी उत्साहाने कामाला लागतात. संमेलनात आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी कविकट्ट्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि वर्तमानपत्रात कधी येईल, याची कवी वाट बघत असतात. साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी आपल्या कवितेची निवड व्हावी म्हणून ते आपल्या उत्तम कविता निवडून ठेवतात. संमेलनात कवी म्हणून वावरणे आणि कविकट्टा व्यासपीठावर कविता सादर करण्याची संधी मिळणे, हे अतिशय आनंदाचे असते. कवितेची निवड झाल्याचे कवींना पत्र आले की, बहुतांश कवी ते फेसबुकवर टाकून आनंद व्यक्त करतात. संमेलनात भारतभरातून येणारे कवी कविकट्ट्यावर भेटतात आणि एक दर्जेदार कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळतो.

या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी गेली नऊ वर्षे कवी आणि गझलकार राजन लाखे सांभाळत आहेत. अर्थात त्यांच्याबरोबर काही कार्यकर्तेही असतात. सर्वांच्या सहकार्याने चक्क तीन दिवस हा कविकट्टा साहित्याची शिंपण करीत असतो. या शिस्तबद्ध, योजनाबद्ध कविकट्ट्याची सुरूवात ८९व्या साहित्य संमेलनापासून म्हणजे २०१६ पासून झाली.

पिंपरी-चिंचवड येथे साहित्य संमेलन होणार होते. तेथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना स्वागताध्यक्षाचा मान मिळाला आणि साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली. त्यांनी कविकट्ट्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष कवी राजन लाखे यांच्यावर सोपविली. संमेलनाचे तीन दिवस आणि संमेलनपूर्व अर्धा दिवस असे साडेतीन दिवस कविकट्टा आयोजित करावा म्हणजे संमेलनाची सुरुवातही कवितेनेच होईल, असे पाटील सरांनी सुचविले.

भारतभरातून कविता मागविल्यावर, त्यावेळी दोन हजार कविता कविकट्टा समितीकडे आल्या. कविता निवड समितीने त्यातून बाराशे कविता निवडल्या. परंतु चार दिवसांत जर या सर्वांना सामावून घ्यायचे असेल, तर कविकट्टा दररोज दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावा लागणार होता. त्याप्रमाणे नियोजन केले. कविकट्ट्यासाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था असल्याने, प्रत्येक तासाला किती कवी आणि ते जिल्हानुसार कसे घेता येतील, याची यादी तयार केली. कवींना पत्र लिहून त्यांची कविता कोणत्या दिवशी व कोणत्या सत्रात आहे, हे कळवले गेले. निवेदक ही कवींमधूनच निवडण्यात आले. त्यांनी आपापल्या सत्राची निवेदनाची धुरा उत्तमरीतीने सांभाळली. अशा पद्धतीने कविकट्टा वरील कविसंमेलन रंगलेच नव्हे तर गाजले.

या ८९व्या साहित्य संमेलनातील वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत ‘न भूतो न भविष्यति’ अशा एकूण १,०२४ कवींना आपली कविता सादर करण्याची संधी मिळाली आणि साहित्य क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक इतिहास ठरला. प्रत्येक कवीला संमेलनात, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह दिले गेले. त्यावेळी राजन लाखे यांनी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडे एक कल्पना मांडली की, ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविकट्ट्यावर सादर झालेल्या कवितांमधून ८९ कविता निवडून त्याचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध केल्यास, हे कविकट्ट्याचे वैशिष्ट्य ठरेल आणि डॉ. पी. डी. पाटील यांनी ती तत्काळ स्वीकारून संमती दिली आणि त्याची ही जबाबदारी राजन लाखे यांना देऊन, त्यांच्या मदतीनेच प्रत्यक्षात सुद्धा उतरविली.

डॉ. पी. डी. पाटील यांना हे माहीत होते की, या नवोदित कवींमध्ये नक्कीच दम आहे. कदाचित हेच उद्याचे साहित्यिक म्हणून नावारूपाला येतील. त्यांचा सन्मान म्हणून ८९ कवितांचा संग्रह या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी प्रत्येक कवीला त्यांनी दहा हजार रुपये एवढे मानधन जाहीर केले. हे साहित्य क्षेत्रात प्रथमच घडले होते. ही झाली एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची गोष्ट. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनात कविकट्ट्याचा कार्यक्रम आयोजित होत राहिला. साहित्य महामंडळाने दरवर्षी राजन लाखे सरांवर टाकलेली कविकट्ट्याच्या आयोजनाची ही जबाबदारी ते आनंदाने स्वीकारत गेले आणि जास्तीत जास्त कवींना संधी देण्याचा प्रयत्न करत गेले. पुण्याप्रमाणेच बडोदा, यवतमाळ, उस्मानाबाद, नाशिक, वर्धा, अमळनेर येथेही हे कविकट्टे रंगले.

वर्धा येथे झालेल्या ९६व्या संमेलनात एक सुंदर गोष्ट घडून आली. तेथे कविकट्ट्यासाठी आलेल्या १५०० कवितांमधून ५२० कवींना संधी मिळाली. डॉ. पी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात उपस्थित कवींमधून ९६ कवी निवडून त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याची कल्पना बोलून दाखविली आणि त्याची जबाबदारी राजन लाखे यांच्याकडे देत असल्याचे जाहीर केले. हे कवितांचे पुस्तक आगळेवेगळे व सुंदर व्हावे म्हणून त्यांनी धाराशिव येथील कवी व चित्रकार असणारे राजेंद्र अत्रे यांना आपल्या योजनेत सहभागी करून घेतले. त्यांनी आपल्या हस्ताक्षरात प्रत्येक कविता लिहावी व कवितेच्या भावार्थाप्रमाणे चित्र काढावे अशी विनंती केली. ९६व्या साहित्य संमेलनाचा यादगार व शानदार असा ९६ कवितांचा संग्रह दिमाखात तयार झाला व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात त्याचे प्रकाशनही थाटात झाले. या प्रसंगी कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी कवींचा सन्मान करण्यासाठी पी. डी. पाटील यांनी संग्रहातील ३ कविता सर्वांसमोर निवडायला सांगितल्या. त्या कवींना रुपये ५१०००, ३१००० व २१००० अशी रोख पारितोषिके दिली. एवढेच नव्हे तर प्रत्येक कवीला रुपये ५००० रोख देऊन त्यांचा सन्मान केला. साहित्य क्षेत्राच्या इतिहासात कवींच्या बाबतीत ही बाब दुसऱ्यांदा घडली होती. अशा प्रकारच्या साहित्यिक उपक्रमांमुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध होत राहील, यात शंका नाही.

meghanasane @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -