Monday, June 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सजाहला सोहळा अनुपम...!

जाहला सोहळा अनुपम…!

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

एखाद्या प्रसार माध्यमाला समाजातील सर्व स्तरांमध्ये स्वतःचं मार्केटिंग करायचे झाल्यास, वेगवेगळ्या संकल्पनांच्या आधाराने भरविले जाणारे सोहळे आज मुंबई आणि तमाम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेतच. पुरस्कार ही एक अशी गोष्ट आहे, जी स्वीकारायला कुणालाही आवडते. आपल्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटते. आपल्या त्या त्या क्षेत्रातील योगदानाची ती एक पोचपावती असते. जी शक्यतो कुणी नाकारण्याच्या भानगडीत पडत नाही. मिळालेल्या पुरस्काराचे स्वरुप कसेही असो, चारचौघात मिरवायला मिळणे, हा आनंद काही वेगळाच असतो. चांगले काम केले आहे, अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस (पारितोषिक), पदक, चषक (करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल, स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते. त्या वस्तूस पुरस्कार म्हणतात.

भारतावर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते, तेव्हा ते ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. त्याशिवाय आजही लोकांनी महान व्यक्तींना दिलेल्या क्रांतिवीर, क्रांतिसिंह, महात्मा, लोकनायक, लोकमान्य, लोकशाहीर, सेनापती, स्वातंत्र्यवीर, हिंदुहृदयसम्राट आदी उपाधी त्या त्या व्यक्तीच्या नावाआधी लावण्याचा प्रघात आहे. हे नामाभिधान एक प्रकारचा शासनकर्त्यांकडून अथवा समाजाकडून मिळालेला एक प्रकारचा पुरस्कारच समजला गेलाय. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात.

संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थांच्या मुखपत्रांतून आणि आता विविध टेलिव्हिजन चॅनल्सद्वारे प्रसिद्ध होत असते आणि तिथेच त्या संस्थेचे मार्केटिंग होत असते. हा एक प्रकारचा सोहळाच (इव्हेंट) असतो. हे मार्केटिंगचे हत्यार अधिक धारदार व्हावे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा सोहळ्यांना मनोरंजनाची खमंग फोडणी दिली की, अगदी सामान्यातला सामान्य प्रेक्षक वेळ देऊन, असे सोहळे आवर्जून बघतो. असा इव्हेंट करायचा म्हटला की, त्याचा खर्च देखील तेवढाच मोठा असतो. मग त्यासाठी जाहिरातदार आणि प्रायोजकांची इन्व्हाॅलमेंट येते. सोहळ्याचा खर्च त्यातून भागवला जातो. एखाद्या वृत्तपत्राने हा सोहळा आयोजित केला असेल, तर पुढल्या किमान तीन महिन्यांसाठीचा मजकूर सहज मिळून जातो, तर चॅनलला किमान चार पाच तासांचे फुटेज मिळून जाते. सद्या प्रत्येक प्रसार माध्यमांसमोर कंटेंटचा प्रश्न आवासून उभा आहे. दाखवून दाखवून दाखवायचे काय? या प्रश्नाचे उत्तर अशा सोहळ्यांतून सहज मिळून जाते.

आज प्रत्येक सेलिब्रिटीला कुठल्याना कुठल्या प्रसार माध्यमातून स्वतःला प्रमोट करणे गरजेचे भासू लागले आहे. सोशल मीडीयामुळे हे जरी सोपे आणि वैयक्तिक स्वरूपाने प्रमोशन करणे शक्य वाटत असले, तरी दुसऱ्या कुणाही संस्थेने केलेले प्रमोशन हे अधिक लोकाभिमुख असते, याबद्दल सर्व सेलिब्रिटींची खात्री झाली आहे. त्यामुळे असे सोहळे आज भारतभर पैशाला पासरी असल्याप्रमाणे तयार झाले. काही चॅनल्स तर यातून बक्कळ पैसा कमविण्यात पारंगत झालेली आढळतील. मात्र याला अपवाद एकच असलेला ‘सांस्कृतिक कला दर्पण’ सोहळा. सांस्कृतिक कला दर्पण ही मराठी चित्रपट आणि नाट्य उद्योगातील एक मान्यताप्राप्त आणि सर्वमान्य सामाजिक संस्था आहे. गेल्या २६ वर्षांपासून संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध कला प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या रंगकर्मींचा सत्कार हा पुरस्कार देऊन करण्यात येतो. याचे सर्वेसर्वा चंद्रशेखर सांडवे हे स्वतः अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते या नात्याने स्वतःचे योगदान अधोरेखित करीतच असतात.

सांस्कृतिक कला दर्पण महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी आणि समाजात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि समुदायांना प्रोत्साहन देण्याचे प्रशंसनीय कार्य करत आहे. नुकत्याच झालेल्या २६व्या ‘सांस्कृतिक कला दर्पण’ सोहळ्यात ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेता बाळ धुरी व ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते, रिलायन्सचे माजी अध्यक्ष रवींद्र आवटी तथा सांस्कृतिक कला दर्पणचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे, सुचित्रा बांदेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सांस्कृतिक कला दर्पणने केवळ चित्रपट, रंगमंच, दूरचित्रवाणीची प्रतिभा ओळखली नाही, तर गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी या क्षेत्रातील नवीन कलागुणांना वाव देण्यासाठी लहान मुलांची नाटके, लोककला आणि गायन स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठीही हात पुढे केला आहे.

सांस्कृतिक कला दर्पण खऱ्या प्रतिभेच्या पाठीमागे एक प्रेरक शक्ती उदयास येण्याच्या आणि त्यांना त्यांच्या योग्य क्षेत्रात प्रस्थापित होण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने ना नफा ना तोटा तत्त्वावर समाजाची नि:स्वार्थ सेवा करत आहे. सांस्कृतिक कला दर्पण सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी पुरस्कारासोबत आणखी कार्यक्रम सुरू करून भविष्यात आपला पिसारा फुलवण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी चंद्रशेखर सांडवे यांचे अभिनंदन करायलाच हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -