Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजAdivasi Diwali : आदिवासींची दिवाळी

Adivasi Diwali : आदिवासींची दिवाळी

  • विशेष : सुनीता नागरे

आदिवासी पाड्यांत रूढी-परंपरा जतन करत साजरी केली जाते दिवाळी

ज्या निसर्गावर आपले आयुष्य अवलंबून आहे, त्या निसर्गाविषयी आदिवासी बांधवांच्या मनात नितांत आदर आहे. निसर्गाप्रती असलेला हा आदर आदिवासींच्या प्रत्येक सण-उत्सवात पाहायला मिळतो. दिवाळीचा सण आदिवासींनाही तितकाच महत्त्वाचा. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासींमध्ये प्रत्येक सणात निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. अर्थात त्यात निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातोच, शिवाय स्वसंरक्षणासाठीही निसर्गाला साकडं घातलं जातं.

दिवाळी हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव. दिव्यांच्या असंख्य ओळी घराच्या अंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. या सणाची सुरुवात वसुबारसेपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व आबालवृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की, आवराआवर, रंगरंगोटी, नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूंची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतषबाजी अन् चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य असते. मात्र मुंबईसह राज्यांमधील आदिवासी पाड्यांमध्ये रूढी-परंपरा जतन करत दिवाळी साजरी केली जाते.

समाजातील काही प्रथांचे समावेश करूनदेखील दिवाळी सण परंपरेनुसार उत्साहात साजरा केला जातो. समाजातील सुशिक्षित नोकरदार यांच्याकडूनच पारंपरिक आदिम संस्कृतीचे दर्शन व संवर्धन न होता आधुनिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीचा सण आदिवासींनाही तितकाच महत्त्वाचा असतो. पावसाळ्यात पिकवली जाणारी पाच प्रकारची पिकं आदिवासी दिवाळी होईपर्यंत खात नाहीत. काकडी, नवीन भात, कोनफळ, चवळी आणि करांदे ही पिकं पावसाळ्यात घेतली जातात. दिवाळीच्या दिवसांत या पाच पिकांची पूजा केली जाते. त्यानंतर चवळी घराघरांत वाटून एकमेकांना शुभेच्छा देत आदिवासी दिवाळीचा आनंद साजरा करतात. याच काळात ठिकठिकाणी झेंडूची पिकं घेतली जातात. मात्र पावसाळा संपल्यावर दिवाळीचा सण येईपर्यंत कुणीही आदिवासी महिला झेंडूची फुले केसात माळत नाहीत. दिवाळीच्या सणात झेंडूच्या फुलांची पूजा केली जाते आणि त्यानंतर महिला झेंडू केसात माळतात. आदिवासी भागांतील पाड्यांवर अनेक सुविधांचा अजूनही अभाव आहे.

आदिवासी भागात पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’

निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासींमध्ये प्रत्येक सणात निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. अर्थात त्यात निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातोच, शिवाय स्वसंरक्षणासाठीही निसर्गाला साकडं घातलं जातं. दिवाळीच्या काळात साजरी होणारी वाघबारसदेखील यातीलच एक. दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते; परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. वाघाने आपल्यावर हल्ला करू नये म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाघाचे पूजन केले जाते. या सणाला वाघबारस म्हणतात. इतरत्र वसुबारस सण साजरा होत असताना आदिवासी पाड्यांवर वाघबारस साजरी होते. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस. काही गावांमध्ये गाई-गुरांचे रक्षण व्हावे म्हणून वाघाच्या मंदिरात कोंबड्याचा बळी दिला जातो. जंगलातील हिंस्त्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांची गाई-गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा, बोकडाचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच काही भागांत डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर शेंदूर लावलेला दिसतो. या चित्राचे पूजन करून वाघबारस सण साजरा होतो. वाघबारसच्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या जंगलातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो, अशा अख्यायिका जुन्या-जाणत्या लोकांकडून सांगितल्या जातात. अशाच काही अख्यायिकांनुसार, सणाच्या एक महिना आधी आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे.

वाघबारसच्या निमित्ताने आदिवासी बांधव शेतीकाम बंद ठेवतात. वाडा, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील अनेक गावांत वाड्या-वस्त्यांवर वाघ देवाची मंदिरे आजही आहेत. आदिवासींच्या जीवनात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. राज्यातील अनेक आदिवासी भागात विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे-पालघर
भागातील आदिवासींमध्ये ही परंपरा अधिक दिसून येते.

आदिवासी बांधवांचा दिवाळी फराळ

आदिवासींकडे आपल्यासारखे लाडू, चिवडा, करंज्या असा फराळ केला जात नाही, तर त्यांच्याकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी देवीला चवळीच्या शेंगांचा आणि काकडी, गूळ आणि तांदळाची भाकरी बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. हाच खरा आदिवासींचा पारंपरिक फराळ असतो. नंतर मग संध्याकाळी सगळे आदिवासी बांधव एकत्र येऊन वाद्याच्या तालावर नृत्य करतात. आदिवासी महिला पारंपरिक दागिने घालतात. सुंदर अशी पारंपरिक केशभूषा करून मग त्यांच्यात तारपा नृत्याची स्पर्धा रंगते. सोबतच वृद्ध आदिवासी महिला पारंपरिक लोकगीते गातात. अशा रितीने आदिवासी बांधव दिवाळी साजरी करतात.

आदिवासी बांधवांची वारलींची दिवाळी ही पाडव्याच्या म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशीपासून ते ढोरं उठवण्याच्या दिवसापर्यंत साजरी केली जाते. या दिवशी आदिवासी बांधवांकडून त्यांच्या पाळीव जनावरांना रंगवलं जातं. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांना गावाबाहेर नेतात. नंतर मग आखाड्यात गवताचा पेंढा पसरलेला असतो. त्यात काही नैसर्गिक जडीबुटी टाकून तो पेटवून त्याच्या धुरातून जनावरे गेली की, त्यांचे रोग नाहीसे होतात, अशी त्यांची पारंपरिक समजूत आहे.

दिवाळीत आदिवासी बांधव हिनाय, वाघ्या, नाराणा देवी आणि गावदेवी या कुलदेवींची मनोभावे पूजा करतात. यामध्ये प्रामुख्याने गावदेवीला मोठा मान असतो. हिरवा खण, नारळ, ऊस, काकडी, बदाम, खारीक, तसंच इतर रानफळे यांचा नैवेद्य दाखवून गावदेवीची पूजा भगताच्या हस्ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते. पूजा करताना देवीसमोर पणती ठेवून त्याभोवती गोंड्याची फुलं पसरली जातात. गावदेवीला चार पायाचा म्हणजे बोकडाचा किंवा दोन पायाचा म्हणजे कोंबडयाचाही नैवेद्य दाखवला जातो. दिवाळीत आदिवासी पाड्यावर गावदेवीची जत्रा भरते. आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन जत्रेचा आनंद लुटतात. आदिवासी बायका पारंपरिक वेशभूषा परिधान करून एका ताटात तांदूळ पसरून त्यावर बोटाने पाच रेषा काढून ते ताट वृद्धमंडळीकडे सोपावतात. त्याच वेळी मग वृद्धमंडळी देवीकडे गावाच्या कल्याणाचं साकड घालतात.

sunitanagare0@gmail.com

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -