Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजKonkan Temple : प्राचीन शिवमंदिर - सोमेश्वर

Konkan Temple : प्राचीन शिवमंदिर – सोमेश्वर

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

रत्नागिरी शहरापासून अगदी जवळच काजळी नदीच्या पलीकडे सोमेश्वर नावाचे एक गाव आहे. तिथेच असलेलं सोमेश्वराचे पुरातन मंदिर हे शिवभक्तांसाठी एक खास जागा आहे. सोमेश्वर गावात पोहोचल्यानंतर अतिशय सुबक बांधणीचे आणि लाकडी कोरीवकाम असलेले हे शिव मंदिर सुबकतेचा नमुना आहे.

रत्नागिरी शहरापासून अगदीच काजळी नदीच्या तीरावर सोमेश्वर नावाचे छोटेसे गाव वसलेले आहे. पूर्वी ही नदी नावेने ओलांडून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर गावी जावे लागायचे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या गावाला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. काजळी नदीवर २००७ साली नवीन पूल झाल्याने आता सोमेश्वर देवस्थानास जाण्यासाठी आपल्याला वाहनाने थेट मंदिर परिसरात पोहोचता येते.

पुरातन असे श्री सोमेश्वराचे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे १००० वर्षांपूर्वी इतर ३६० मंदिरांबरोबर सोमेश्वर मंदिर बांधले गेले. यापैकी फक्त काही स्थापत्य क्षेत्रातील आश्चर्ये आता शिल्लक आहेत आणि सोमेश्वर हे असेच एक आश्चर्य आहे. यात सुंदर दगडी कोरीवकाम आहे आणि मार्लेश्वरप्रमाणेच हे मंदिर हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले आहे.


हे मंदिर एकावर एक अशा दोन गर्भगृहांसाठी प्रसिद्ध आहे. खालच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे, तर वरच्या गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती आहे. दगडी कोरीव काम आणि निसर्गसौंदर्याने युक्त. हे प्रामुख्याने त्याच्या एकावर एक अशा दुहेरी गर्भगृहासाठी प्रसिद्ध आहे. खालचे गर्भगृह “भगवान शिव” यांना समर्पित आहे आणि त्यात शिवलिंग आहे, तर वरचे गर्भगृह “भगवान गणेश” यांना समर्पित आहे आणि त्यात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृह उत्कृष्ट कोरीव दगडी खांबांवर उभे आहे, तर सभागृह किचकटपणे कोरलेल्या लाकडी खांबांवर उभे आहे. मंदिरात अतिशय सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले आहे. म्हणजे साधारणपणे मंदिरे पूर्वाभिमुख असतात; परंतु पश्चिमाभिमुख आहे. मंदिराभोवताली दगडी तटबंदी आहे. शंकराचार्यांनी वर्णन केलेल्या चतुर्थ मंडल पद्धतीने या मंदिराची बांधणी केली गेली आहे.

मंदिरात अतिशय सुंदर दगडी दीपमाळा आहेत. या रचनेच्या दीपमाळा हे कोकणचे वैशिष्ट्य आहे. मंदिरात काही प्राचीन पाषाण मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यावर संशोधन झाले, तर कालनिश्चिती होऊ शकेल. मंदिराच्या आत आणि सभोवताली एक सुखद आणि आरोग्यदायी प्रभा असते.

भक्कम दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार आठवले आडनावाच्या एका सत्पुरुषाने सोळाव्या शतकात केला असल्याची माहिती मिळते. त्यापूर्वीची माहिती मिळू शकत नाही. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हे मंदिर सुस्थितीत असल्याने आजपर्यंत कोठलीही डागडुजी केली गेलेली नाही.

चारही बाजूंनी भक्कम दगडी तटबंदी, विस्तीर्ण प्रांगण असलेल्या या मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस तीन आणि उजव्या हाताला तीन अशा एकूण सहा दीपमाळा दिसतात. सोमेश्वर गावात स्थायिक झालेल्या सोहनी, आठवले, दामले, केळकर, फडके अशा चितपावन घराण्याच्या कुलबांधवांनी त्या बांधल्या आहेत.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -