Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभान जबाबदारीचे

भान जबाबदारीचे

प्रियानी पाटील

मुलगी म्हणून जन्म घेतला तर भविष्यात अनेक नाती जपायची आहेत, याचं एक ओझं पहिल्यापासूनच मनावर लादलं गेलं. नात्यांचं काही नाही पण आपण जपणारी नाती समोरची माणसं पक्की निभावणार आहेत का? याचा थांगपत्ता नसतानाही मुलगी म्हणून जबाबदारीनेच वागायचं असं पक्कं मनावर बिंबवलं गेलं.

भाऊ मोठा असला तरी बहीण म्हणून जबाबदारी आपली. मुलगी म्हणून सगळी कामं करता आली पाहिजेत हा पुन्हा अट्टहास. मग शिक्षणाचं काय? तेही आलंच पाहिजे. पण बहुतेक मुली वयात आल्या की, शाळा सोडून द्यायच्या. घरच्या जबाबदारीचं ओझं त्यांनाही वाहायचं असायचं. जेवण शिकून घ्यायचं असायचं. कारण तोवर विवाहाचे वेध लागलेले असायचे. काही मुली जेवण करण्यात एवढ्या पारंगत झालेल्या असायच्या की, बघ, बघ शिक जरा, असे डोस पाजले जायचे. उन्हाळ्यात विहिरी आटल्या की, पुन्हा घागरी घेऊन तलाव, वििहरी गाठाव्या लागायच्या. यावेळी डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती हात सोडून चालण्यातली मजा मनसोक्त असायची. पण दमछाकही तेवढीच असायची. हे सगळं शिकून घेतलं पाहिजे हा अट्टहास असायचा.

रांगोळी सुबक आली पाहिजे, फुगड्या खेळता आल्या पाहिजेत, गाणी, उखाणी सारं आलं पाहिजे. गणपती स्तोत्र पाठ पाहिजे, शिवलीलामृतचा अकरावा अध्याय आजीचा पाठ म्हणून तोही पाठ करा. पाठ होत नसला तरी वाचा मग, आजी जेवढे उपवास करते तेवढे सगळे उपवास धरायला शिका. सवय लागेल. सायंकाळच्या दिवे लागणीला झोपू नका, जेवणही करू नका, पाणी पिऊ नका, उगाचच घरात मस्ती करू नका, जेवण झाल्यावर भांड्यांचा खटारा रात्री कितीही वाजले तरी दुसऱ्या दिवशी ठेवू नका, शिक्षण घेताना दुनियेच्या मागे राहू नका, स्पर्धांमध्ये सगळे भाग घेणार मग तुम्ही का मागे, चित्रकला, वक्तृत्व, शिक्षक दिन, रांगोळी स्पर्धा सगळी बक्षिसं येऊ दे आपल्याच घरात, भाऊ शाळेत घेऊन जाईल, त्याच्यासोबतच घरी यायचं. ठामपणे बजावलेलं.

लहानपण हे आपल्या हातात नसतं. बहीण लहान असेल तर भाऊ जरा हक्कच गाजवतात. लग्न झाल्यावर नवरे…पण अलीकडे पती-पत्नीचं नातं हे मित्रत्वाने सांधलेलं असतं म्हणून नाहीतर संसाराच्या परिपाठात भाकऱ्या थापायच्या असेच काहीसे अनुभव आजच्या मुलींना आले असते. करिअर करता आले नसते.

कुटुंबात विशेषत: मुलींकडे जबाबदारी म्हणून पाहिले जाते. तिला सारं काही आलं पाहिजे याकडे लक्ष दिले जाते. ज्यांचे मोठे भाऊ ते आपल्या बहिणींना रीत बरोबर शिकवतात, तेवढीच ते त्यांची काळजीही घेतात. लहान बहिणीला शाळेत नेण्यापासून घरी जबाबदारीने आणण्यापर्यंतची जबाबदारी ते उत्तम निभावतात.

भाऊ आपल्यापेक्षा हुशार. आपणही त्याच्यासारखं असावं असं काही मनाला आजवर वाटलेलं नाही. तो हुशार आहे, त्याला आपण काय करणार? आपण जसे आहोत तसेच ठीक आहोत म्हणून बरेचदा घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले. नवरात्रीच्या काळात रांगोळी स्पर्धेत याचा पहिला नंबर यायचा मोठ्या गटात. लहान गटात आमचा दुसरा नाहीतर तिसरा असायचा. पण भ्रांत नव्हती. जबाबदारीचं एक ओझं त्याच्यावर घरातील माणसांनी दिलं होतं ते म्हणजे बहिणीला शाळेत न्यायचं आणि स्वत:बरोबर घेऊन यायचं.

एका स्पर्धेच्या वेळी हे महाशय स्पर्धेत गुंग असताना बराच वेळ झाला तरी बाहेर येईनात, म्हणून कंटाळा आलेला. बरीच मुलं असल्यामुळे याचं लक्षही नव्हतं. घरी जायला बराच वेळ लागेल म्हणून मग आपल्या घरापर्यंत कुणी जाणारं आहे का ते पाहिलं आणि मग घर गाठलं एकदाचं. भूक तर एवढी लागलेली की आल्यावर पहिलं खाऊन घेतलं. त्याला घरी यायला उशीरच होईल असं सांगितलं. एक दिवस एकटं घरी आलं तर चालतं, काही नाही म्हणून दुर्लक्ष केलं आणि मजेत काकांच्या मुलींबरोबर भातुकलीचा खेळ सुरू झाला.

आणि बऱ्याच वेळाने भावाची स्वारी आली, पाठीवर दप्तर आणि दारात येताच रडून हैदोस घातलेला. हरवली…. हरवली म्हणत तो रडत आलेला पाहताच घरातील सगळे त्याच्याभोवती एकवटले. कोण हरवली, अरे ही तर केव्हाचीच घरी येऊन पाेहोचलीय. म्हणून सगळ्यांनी त्याला समजावलं. तेव्हा हसू एकदम अनावर झालेलं. त्यानंतर ओरडा.

जबाबदारीचं भान असणारा भाऊ आणि बेफिकीर आपण यात काहीसं तथ्य असलं तरी मुलगी म्हणून असंच करा, तसंच करा असं म्हणून मुलींभोवती एकप्रकारे शिस्तीचे वलय निर्माण केले जाते आणि नाही ऐकलं तर ओरडा दिला जातो. कॉलेजमध्ये शिकतानाही तसंच एकतर मुलींना धाक दाखवला जातो, तरीही शिका असं सांगितलं जातं. कारण घराण्याचं नाव उज्ज्वल करायचं असतं.

खरं तर जबाबदारीचं भान मुलींनाही असतं. धाक दाखवून, दबाव आणून काहीवेळा मुली शिक्षण घेऊनही त्याचा उपयोग करताना दिसून येत नाहीत. विवाहानंतर संसारात रमल्या की करिअर कुठच्या कुठे विसरून जातात. शिस्तीच्या वलयात गुरफटून जातात. नव्या विचारांची प्रेरणा जागवायची असेल तर आजच्या मुलींनी स्वत:ला सिद्ध केलं पाहिजे. जबाबदारीचं भान जरूर असावं, पण मुलीना सुद्धा मन असतं, ती कठपुतळी नसते याचं भान सर्वांनीच ठेवणं गरजेचं असतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -