नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व संदर्भ हटवण्यात आले आहेत. याबदल्यात या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना सरकारी योजना तसेच महाकुंभासारखे विषयांवर धडे गिरवावे लागणार आहेत.
एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व संदर्भ हटवून त्याऐवजी सरकारी योजनांसारखे विषयांचा नवीन अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. प्रकाशित झालेले पुस्तक- ‘एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियाँड’ हे सुधारित अभ्यासक्रमाचा केवळ पहिला भाग आहे. तर दुसरा भाग आगामी महिन्यांत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे. मात्र, वगळलेला मजकूर दुसऱ्या भागात समाविष्ट केला जाईल का, यावर अद्याप कोणतीही टिप्पणी केलेली नाही. सातवीच्या नवीन एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व उल्लेख काढून टाकण्यात आले आहेत. याऐवजी, भारतीय राजवंशांवरील प्रकरणे, ‘पवित्र भूगोल’ आणि इतर अनेक संदर्भ जोडले गेले आहेत.
यामध्ये प्रयागराजचा महाकुंभमेळा आणि मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ, अटल बोगदा (टनल) सारख्या सरकारी योजनांचा नवीन इयत्ता सातवी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या आठवड्यात प्रकाशित झालेली ही पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क २०२३ च्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहेत.
नवीन अभ्यासक्रमामध्ये काय समाविष्ट केले आहे ?
“एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड” या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर नवीन प्रकरणे आहेत, ज्यात “भारतीय नीतिमत्ता”वर लक्ष केंद्रित केले आहे. पुस्तकात आणखी एक नवीन भर म्हणजे “जमीन कशी पवित्र होते” हे प्रकरण आहे जे भारतात आणि बाहेर इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी आणि झोरोस्ट्रियन, हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म यासारख्या धर्मांसाठी पवित्र मानली जाणारी ठिकाणे आणि तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रित करते. या प्रकरणात “पवित्र भूगोल” सारख्या संकल्पनांचा परिचय करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये १२ ज्योतिर्लिंगे, ४धाम यात्रा आणि “शक्तीपीठे” सारख्या ठिकाणांच्या जाळ्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. या प्रकरणात नद्यांचे संगम, पर्वत आणि जंगले यासारख्या पूजनीय ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे.