छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच इतर वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये आपला देश आघाडीवर असून आपल्या देशात वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून नवे क्षेत्र खुले झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान,अंतर्गत आर. के. दमानी मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयाच्या कौशलम् – द स्किल लॅबचे उद्घाटन जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, उद्योजक कृषी कुमार बागला, उमेश दाशरथी, डॉ.विदेश केसरी,डॉ. सतीश कुलकर्णी, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती शिरेडकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
नड्डा म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या सेवेचा वारसा या रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. आणि ही संस्था आरोग्य सेवेसाठी समर्पित आहे. आरोग्य सेवेचे शाश्वत उद्दिष्ट समोर ठेवून मिशन मोडवर या रुग्णालयाने समाजाची गोरगरीब रुग्णांची सेवा केली आहे. या सेवेचे विस्तारित स्वरूप आर के दमानिया रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जाईल. बदलत्या आरोग्य सेवेतील तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हावा. यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालयातील प्रत्येक डॉक्टर आणि सेवा च्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य क्षेत्रामधील भारताची प्रगती ही इतर देशांना मार्गदर्शक आहे. लोकसंख्या व भौगोलिक विविधता असूनही आरोग्य व्यवस्था सक्षम आणि अग्रेसर असल्याचे, प्रतिपादन मंत्री नड्डा यांनी केले. जागतिक पातळीवर जास्तीत जास्त डॉक्टर विविध विषयातील तज्ज्ञ निर्माण करण्याची संधी भारताने निर्माण केली असून या देशातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर परदेशातही आपले विशेष स्थान निर्माण करून आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा ही एक संधी समजून समाजसेवा करण्याचे ध्येय ठरवावे, असे आवाहन नड्डा यांनी विद्यार्थ्यांना केले.