दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीला ६ विकेटनी हरवले. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात आरसीबीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १६२ धावा केल्या होत्या. या विजयासह आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत.
आरसीबीकडून कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी कमालीची फलंदाजी केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळेच आरसीबीला हा विजय साकारता आला. कृणालने या सामन्यात नाबाद ७३ धावा तडकावल्या. तर विराट कोहलीने ५१ धावांची खेळी केली.
दिल्लीकडून लोकेश राहुलने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. अभिषेक आणि फाफ डू प्लेसिस यांनी सुरूवात चांगली करून दिली. मात्र अभिषेक पोरेल २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर करूण नायर स्वस्तात परतला. त्याने केवळ ४ धावा केल्या. प्लेसिसनेही २२ धावा ठोकल्या आणि तो बाद झाला. तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने एकीकडे किल्ला लढवत असताना ४१ धावा ठोकल्या. त्याने ३९ बॉलमध्ये ३ चौकार ठोकत ही धावसंख्या केली. कर्णधार अक्षऱ पटेलला १५ धावाच करता आल्या.