श्रद्धा बेलसरे खारकर
राहुल सवने यांचा व्यवसाय होता रद्दी विक्री करण्याचा. रोज सकाळी उठून सायकलला एक मोठे पोते आणि तराजूकाटा लावून गावभर फिरून रद्दी गोळा करायची. ती मोठ्या व्यापाऱ्याकडे जाऊन विकायची आणि त्यातून जे पदरात पडेल त्यावर उदरनिर्वाह करायचा, पण इतर असंख्य रद्दीवाल्याप्रमाणे ते नव्हते. त्यांचे वडील नामदेवराव हे बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक होते. बाबासाहेबांचा सहवास त्यांना बरीच वर्षे लाभला. नामदेवरावांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला. पुढे १९५६ मध्ये बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि नामदेवरावांनी मुंबईला रामराम ठोकला. बाबासाहेबांविना त्यांना मुंबईत राहावेसे वाटेना. ते इंदापूरजवळच्या लासुर्णे गावी आले. तिथे त्यांनी मातोश्री रमाबाई वसतिगृहाचे काम करायला सुरुवात केली. सुदैवाने घरची परिस्थिती चांगली होती. वडिलांची १६ एकर शेती असल्याने एकंदर बरे चालले होते.
योगायोगाने त्या शेतीच्या ठिकाणीच उजनी धरणाचे काम सुरू झाले आणि सर्व जमीन ओलीताखाली गेली. अचानक जगण्याचे एकमेव साधनच निघून गेले. त्यावेळी छोटा राहुल ९ वीत शिकत होता. त्याला मधेच शाळा सोडावी लागली. एक खाऊनपिऊन सुखी शेतकरी ते थेट दुपारची भ्रांत इतका वेदनादायी प्रवास अनुभवावा लागला. अपुरे शिक्षण, हातामध्ये भांडवल नाही. व्यवसाय करण्याचा अनुभव नाही. काय करावे असा प्रश्न पडला. एक जुनी सायकल होती. मग त्या सायकलवर राहुलने रद्दी विकण्याच्या व्यवसाय सुरू केला. रद्दीबरोबर भंगार मिळू लागले. चार पैसे मिळू लागले आणि निदान रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटला.
मात्र कर्तुत्ववान माणूस कसा सगळ्यात सकारात्मकता शोधतो त्याचे राहुल एक उत्तम उदाहरण आहे. ते म्हणतात, “रद्दी विकण्याच्या व्यवसायातून रोज नवे अनुभव माझ्या गाठीला पडू लागले. चांगले कपडे घातलेले, खूप वाचणारे छान बोलणारे लोक भेटू लागले. आपणही असे व्हावे असे वाटू लागले.” थोड्या-फार वाईट अनुभवाबरोबर राहुलबाबत एक चांगली गोष्ट घडत गेली ती म्हणजे रद्दीत वर्तमानपत्राबरोबर काही चांगली पुस्तके मिळायची. ती पुस्तके त्याच्या वाचनाची भूक भागवत होती. जुने का होईना पण पेपर वाचायला मिळू लागले. राहुलने अधाशासारखी वाचायची सुरुवात केली. रोजच्या रोज रद्दी जमा झाली की, आधी तो त्याची छाननी करू लागला. महत्त्वाचे वाटणारे वृत्तपत्र, रविवार पुरवण्या आणि पुस्तके बाजूला काढून ठेवू लागला. दिवसभराचा कामाचा बोजा संपल्यावरती रात्री त्याचे वाचन सुरू असायचे. या अफाट वाचनातून एक गोष्ट घडत गेली ती म्हणजे आपल्याला वाचनातून कितीतरी गोष्टी शिकता आल्या. आता आपली विचाराची पद्धतही बदलली असे त्यांच्या लक्षात आले. आपणही लिहू शकतो असा जणू साक्षात्कारही झाला, पण ‘माझे शिक्षण फक्त नववीपर्यंत मी कसे लिहिणार?’ असे विचार येऊन मध्येच लिहिता हात मागेही सरकायचा! एक दिवस वडिलांशी बोलताना राहुल म्हणाले की ‘बाबा, मला लिहावेसे वाटते मी काय करू?’ वडील आनंदाने म्हणाले ‘अरे. मग लिही की!’ ‘पण बाबा माझे शिक्षण किती कमी आहे. मी कसे लिहू?’ वडील म्हणाले, ‘अरे जगाच्या बाजारात खूप काही शिकायला मिळते. ते तू तुझ्या वयाच्या मानाने खूपच शिकला आहेस. शिवाय आपल्याला तीन पिढ्यांचा वारसा आहे तू जरूर लिही, जसे जमेल तसे लिही.’ वडिलांच्या अशा प्रोत्साहनामुळे राहुलला आत्मविश्वास मिळाला. मग त्याच्या लिखाणास सुरुवात झाली.
व्यवहारी जगात सतत वावरल्यामुळे राहुलने खूप अनुभव घेतले होते. रोजच्या जीवनात गरीबीचे, उपेक्षेचे चटके बसत होते. काही भलीबुरी माणसे भेटत होती. त्यांच्याबद्दलची निरीक्षणे मनात नोंदवली जात होती. मग रोजचे काम सांभाळत, संसार करत करत राहुलने लिहिणे सुरू ठेवले आणि एक दिवस त्यातून एक वेगळी साहित्यकृती बाहेर पडली. राहुलच्या पहिल्या पुस्तकाचे नाव होते ‘मोजमाप.’ =दररोज रद्दी मोजून मोजून जीवितकार्य चालवणाऱ्या राहुलला आपल्या पहिल्या पुस्तकासाठी हे नाव सुचले यातच त्यांच्या प्रतिभेची भरारी दिसून आली. दिवसभर रद्दी मोजायची. हातात कायम तराजू असायचा. पुन्हा संध्याकाळी व्यापाऱ्याला रद्दी देताना रद्दी मोजून द्यायची. हिशोब करायचा आणि मिळतील ते पैसे खिशात टाकायचे. ‘म्हणून मी पुस्तकाला ते आगळे नाव दिले. कारण शेवटी जगताना मनात सगळ्याच गोष्टींचे मोजमाप करायला आपण शिकत असतो. मी ते रद्दी विक्रीतून शिकलो.’ असे राहुल अभिमानाने सांगतो. सुरुवातीला पहिल्या पुस्तकासाठी ‘कुणी प्रकाशक मिळेल का?’ असा प्रश्न पडला होता. पण त्यावेळी योगायोगाने सोनल प्रकाशनचे विलास सोनवणी भेटले. त्यांनी पुस्तके तर प्रकाशित केलीच. त्याचबरोबर चांगले वितरण करून मानधन सुद्धा दिले. मग या नवख्या लेखकाचे साहित्यविश्वातून चांगलेच स्वागत झाले आणि मराठी सारस्वताच्या दरबारात राहुलचा प्रवेश वाजतगाजत झाला. समीक्षकांनी पुस्तकांचा गौरव केला. रद्दी विकणाऱ्या मुलाची ही आत्मकथा लोकांना कमालीची भावली. लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, दया पवार यांसारख्या वेगळ्या पठडीतल्या मोठ्या लेखकाबरोबर त्यांचे नाव येऊ लागले.
यावेळी श्रीपाल सबनीस, आनंद यादव, गंगाधर पानतावणे यांच्यासारख्या जेष्ठ साहित्यिकांनी त्याचे भरभरून कौतुक करून पाठींबा दिला आणि पुढील लेखनास प्रवृत्त केले. मग ‘पुढे काय?’ हा प्रश्न होताच. मग पुढील पाच वर्षे राहुल शांत होता. तरीही आत खूप मननचिंतन सुरू होते. त्यातून त्याचे दुसरी कलाकृती आली “घडतं असं कधीतरी” इथपर्यंतचा प्रवास खडतर होता. आर्थिक विवंचना होत्याच. पण या प्रवासात त्यांना पत्नीची मोलाची साथ मिळाली, पण पुढे अजून एक मोठे दुख वाट बघत होते. पत्नीला कर्करोग झाला. खूप यातना सहन कराव्या लागल्या. त्यातच त्यांचे निधन झाले. राहुलला पत्नी वियोगाचे दुख भोगावे लागले. त्यातूनही स्वत:ला सावरून कामाला पुन्हा सुरुवात केली. त्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी अशा विविध महाविद्यालयात अनुभवकथनासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्याच्याबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही जोरात सुरू केले. ते म्हणतात. ‘श्रद्धा असावी पण ती डोळस असावी. डोळस श्रद्धा गोमटी फळे देते. पण अंधश्रद्धा मात्र विषारी फळे देते. प्रत्येकाला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखता आला पाहिजे.’ आज राहुल सवने हे महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक आणि फर्डे वक्ते म्हणून नावारूपास आले आहेत. रद्दी विक्रीसारख्या छोट्या व्यवसायातून त्यांनी घेतलेली भरारी फार मोलाची आहे.
[email protected]