Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर होणार तपास

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर होणार तपास

सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून करणार प्रभावी देखरेख

मुंबई (प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत १३९ रेल्वे स्टेशन्स आहेत.

दिवसभरामध्ये लोकल ट्रेनच्या जवळपास साडेसात ते आठ हजार फेऱ्या होतात. यामधून दैनंदिन ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. आयुक्तालयांतर्गत या सर्व रेल्वे स्टेशन्सवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी देखरेख ठेवली जात आहे. सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस मित्र, शांतता समिती, प्रवाशांबरोबरच प्रवाशी संघटना तसेच कॅन्टीन, रेल्वे, सफाई कर्मचारी, कर्मचारी, हमाल, हमाल बुट पॉलिशवाले यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहितीबरोबरच कोणतीही संशयित व्यक्ती, गोष्ट, वस्तू असल्यास त्याची तत्काळ माहिती मिळते. प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला किमान दोन तास क्षेत्रीय ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला किमान चार तास पेट्रोलिंग करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रवाशांना अचानकपणे तपासणी करण्याची मोहीम सुरू असते. त्यामध्ये विशिष्ट कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्यानुसारच ही तपासणी करण्यात येत असते. तसेच लोकल ट्रेनमध्येदेखील अचानक तपासणी म्हणजेच ‘मॅसिव्ह फ्लॅश चेकिंग’ करण्यात येते. त्यात एक अधिकारी व त्यांच्या सोबत तीन ते चार कर्मचारी असतात. चालू लोकलमध्ये प्रवाशांची, रॅकची आणि प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानाची ते अचानकपणे तपासणी करतात. दैनंदिनरीत्या घातपात तपासणी करण्यात येत असते. विविध पोलीस स्टेशनकडून या बाबींचे दैनंदिनरीत्या आयुक्तालयातील ‘अंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रुप’मध्ये फोटो पोस्ट करण्यात येतात. या फोटोंचे नियंत्रण कक्षात एकत्रिकरण केले जाते. घातपात तपासणीबाबत मुंबई रेल्वे पोलीस सजग राहून कार्य करत आहे, असेही रेल्वे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे. दरम्यान, मुंबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा अधिक विचार होत असताना, सीसीटीव्ही कॅमेरे अधिक प्रभावी करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही याचा अधिक विचार करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -