Friday, April 25, 2025

पहा मगच बोला…

ऋतुराज – ऋतुजा केळकर

काल एक विचित्र व्हीडिओ पाहिला त्यात एका विशिष्ठ धर्मातील लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांना पळवून लावण्याच्या घोषणा देत होते. हिंदुस्थान सारख्या देशात हे असे दृश पाहायला मिळावे हे किती दूर्दैवाचे आहे नाही का? मग मनात प्रश्न निर्माण झाला, ‘सर्व धर्म समभाव’ असलेल्या या देशातील मुख्य धर्म हा ‘हिंदू’ आहे. खरतर त्याची उत्पत्ती, तर चार ते पाच हजार वर्षांपूर्वी झालेली आहे तरीही या आपल्या हिंदुस्थानात ही परिस्थिती निर्माण व्हावी ही खरतर प्रत्येक हिंदूला अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना आणि सतत प्रचलित राहिलेला धर्म मानला जातो, त्याची सुरुवात किमान ४,००० ते ५,००० वर्षांपूर्वी झाली असल्याचे मानले जाते. आता याचा इतिहास म्हणाल तर, वैदिक काल म्हणजे इ.स. पूर्व १५००-५०० की जेव्हा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदांचा उदय झाला आणि यज्ञसंस्कृती आणि ऋषींकडून त्यांच्या गुरुकुलात जाऊन तिथे राहून घेतलेले ज्ञान हा एक व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासाचा आणि परंपरेचा भाग होता आणि उपनिषदांचे म्हणाल तर खरतर त्यांची संख्या निश्चित नाही; परंतु सुमारे शंभर ते दोनशे उपनिषदे हिंदू साहित्यात आहेत पण त्यातील १०८ उपनिषदे प्रचलित असली तरी मुख्य १३ उपनिषदे तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. तसं पाहायला गेलं तर वेद हे ज्ञानाचे मूलभूत स्रोत मानले जातात. यात फक्त देवांच्या उगमांची किंवा अध्यात्मिक पूजापाठाची माहिती आहे असे नव्हे, तर उपनिषदे ही त्यांच्या तात्त्विक आणि गूढ अर्थावर तसेच आध्यात्मिक ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार यावर भर देतात. नैसर्गिक शक्तींचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि प्रभाव तसेच कर्मयोगाचा संदेश यात आहे. शिवाय व्यावहारिक जीवनाचे मार्गदर्शन देखील यात समग्र आहे. तसेच संस्कृतमधील हे साहित्य आपल्याला फक्त आपल्या संस्कृतीच्या जवळच नेत नाही, तर जीवनातील मूलभूत सत्यदेखील उलगडून सांगतात. तसे पाहिले तर वेद तसेच उपनिषदांप्रमाणेच संस्कृतमधील श्लोकही तितकेच अर्थपूर्ण आहेत. आज त्यातीलच एक श्लोक इथे आठवला आणि तो म्हणजे,

ईक्षणं द्विगुणं
भुयात्भाषणस्येति वेधसा|
अक्षिणी द्वे मनुष्याणां
जिह्वा चैकेव निर्मिता||

याचा अर्थ असा आहे की, बोलण्याच्या दुप्पट निरीक्षण केले पाहिजे, म्हणून निर्मात्याने माणसांसाठी दोन डोळे आणि एकच जीभ बनवली आहे. अगदी परवा परवाची बातमी की जी पटकन कुणाच्याही लक्षात देखील आली नाही, एका चॅनलवर धक्कादायक बातमी म्हणून अगदी व्हीडिओ सकट त्यांनी सांगितले की, ‘मटणाच्या दुकानाच्या लाईनमध्ये एक कुत्रा ‘शिरला’ आता मला सांगा मासे किंवा मटणाच्या दुकानात कुत्रा “शिरला” ही काही धक्कादायक बातमी आहे का? आता ही बातमी अगदी विस्तृत आली होती पण बातम्यांच्या ओघात ती कुणाच्याही लक्षातच आली नाही. इथेच मी आता जो श्लोक म्हटला त्याचा अर्थ समजतो असं नाही का वाटत? आता यात मीडिया काय कशा आणि त्याच्या चॅनलचे टीआरपी वाढवायला काय करतात काय नाही याबद्दल मला आता मुळीच बोलायचे नाही. पण आपण काय काय बोलतो यापेक्षा आपण काय पाहतो यावर जर जास्त भर दिला, तर बरं होईल, त्यामुळे नेहमीच आपण समोरच्याला जास्त चांगल्या पद्धतीने ओळखू शकू. इथे मला आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे सध्या काजोलची गाजत असलेली एक आईस्क्रीमची जाहिरात आणि त्यात प्रचंड बोलणारी ती आईस्क्रीम तोंडात गेल्यावर हरवून जाणारी. पटकन हसायला लावणारी ती जाहिरात बरच काही शिकवून जाते. ते म्हणजे, बोलण्यापेक्षा पाहण्याची क्षमता ही नेहमीच द्विगुणित असावी. परमेश्वराने माणसाला दोन डोळे दिले, पण जीभ मात्र एकच दिली आहे आणि जगात बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण त्यातूनच शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.

आता फक्त याच श्लोकाचा अर्थ घ्यायचा झाला तर जिव्हा ही एकच का? तर शब्दांची ताकद मोठी असते. त्यांचा योग्य वापर करावा. तसे देखील ‘तोंडातून शब्द आणि भात्यातून तीर’ हा एकदा का बाहेर पडला की तो परत येत नाही. भात्यातील तीराचे म्हणाल तर तो जखम करून जातो तर शब्दांचे म्हणाल तर ते मनावर खोलवर परिणाम किंवा समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव ठेवून जातो आणि समाजात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसाच उमटवून जातो. म्हणूनच संवाद आणि विचार यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे आणि विचारांवर तसेच आचारावर संतुलन तेव्हाच राहील जेव्हा आपण जास्त निरीक्षण करू. म्हणूनच नेहमी मनुष्याने अधिक पाहावे, निरीक्षण करावे आणि मगच विचारपूर्वक बोलावे. मनुष्याला दोन डोळे दिले गेले आहेत, जे अधिक पाहण्याची क्षमता देतात. याचा अर्थ समजून घेण्यावर भर द्यावा हे जरी खरे असले तरीही त्याचा अर्थ योग्यत्या पद्धतीने काढणे तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच या श्लोकात सांगितल्याप्रमाणे समाज, शिक्षण आणि वैयक्तिक जीवनात संयम, विचारशीलता आणि सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसेच सकारात्मक आणि नकारात्मक परिणामदेखील लक्षात घेतले पाहिजेत की जे आज हिंदू संस्कृतीच्या रक्षणार्थ अत्यंत गरजेचे आहे.

कोण कुठे काय बोलतोय? काय वागतोय? याकडे आपले व्यवस्थित लक्ष असेल तर आणि फक्त तरच आपला धर्म, आपली परंपरा आणि आपले अस्तित्व टिकून राहील. शेवटी आपलं आचरण हेच महत्त्वाचे असते आणि शब्द आणि कृती यावरच ते अवलंबून असते. आपल्या शरीराच्या चेतनेचे तेज हे जर स्थिर ठेवायचे असेल, तेजस्वी करायचे असेल तर ते अति प्रभावी आणि इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती ही तीनही तत्वे जर एकवटली तरच त्यातून भौतिक सौंदर्याच्या प्रत्यंच्यातून शरीर, मन आणि बुद्धीचा योग्य तो वापर करून योगक्षेम साधता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -