उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा त्यांनाही बसतातच. त्यामुळे उन्हामुळे झाडं सुकून जातात. अशा वेळी झाडांना ताजंतवानं कसं ठेवायचं हे जाणून घेऊया या लेखातून…
उन्हाळ्यात माती लवकर वाळते, त्यामुळे झाडांना पुरेसं पाणी मिळत नाही. उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे पानं आणि खोडंही सुकतात. अशा वेळी मातीत जास्तीत जास्त ओलावा राहील याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी झाडांना पाणी नेहमी पहाटे किंवा ऊन उतरल्यानंतर घाला. त्यामुळे मातीत ओलावा टिकून राहतो. चहा उकळल्यानंतर त्यात राहणारा चहाचा चोथाही आधी स्वच्छ धुऊन मग तो चुरावा आणि पाण्यासोबत झाडांना घालावा.. त्यामुळे मुळांना थंडावा राहतो.
Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….
उन्हाळ्यात झाडांना कोरडी खतं शक्यतो घालू नका कारण, त्यामुळे उष्णता वाढते. त्या ऐवजी कांदा, केळं किंवा बटाट्याची सालं तीन दिवस हवाबंद डब्यात पाणी घालून ठेवा आणि तीन दिवसानंतर त्यात पाणी वाढवून ते झाडांना घाला. त्यामुळे मुळांना फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम मिळतं. आठवड्यातून एकदा हळद मिसळलेलं पाणी झाडांना घाला. त्यामुळे मुळांना झालेली दुखापत किंवा मातीतली कीड नष्ट होते. खूप ऊन असेल तर पातळ पंचा किंवा टॉवेल ओला करून तो झाडांवर सावली येईल असा लावा. त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त बसणार नाही. तर तुम्हीसुद्धा अशाप्रकारे तुमच्या घरातल्या झाडांना असं ताजंतवानं नक्की ठेऊ शकता.