मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. अजूनही या गाण्याची क्रेझ कायम तशीच टिकून असल्याचे दिसत आहे. अनेक कार्यक्रमात, मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कार सोहळ्यात इतकेच नव्हे तर अनंत अंबानी यांच्या लग्नातही संजू राठोडच्या गाण्यावर लोक थिरकले. संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ने भारतीय सेलिब्रिटींसह परदेशातील किलीपॉललाही वेड लावलं आहे. कित्येकजण ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. आपल्या सुपरहिट “गुलाबी साडी”ने इंटरनेटवर धुमाकूळ घातले असताना आता संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!
गायक संजू राठोड त्याचं नवं गाणं “शेकी” घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच हे गाणं त्याच्या युट्यूबवर अपलोड करण्यात आलं आहे. “शेकी” हे गाणं संजू राठोड याने स्वतः गायलं, लिहिलं आणि संगीतबद्धही केलं आहे. या गाण्यातून संजू आधुनिक साऊंड्स आणि सांस्कृतिक मुळांतील खडखडीत भावना यांचं एक जबरदस्त मिश्रण करून घेऊन आला आहे. जी-स्पार्कच्या खास उच्च-ऊर्जा प्रोडक्शनखाली तयार झालेलं हे मराठी गाणं लोकसंगीताच्या मातीतल्या गंधाला अफ्रिकन बीट्सच्या जोशात मिसळून टाकत आहे.
दरम्यान, या गाण्यात बिग बॉस फेम ईशा मालवीय दिसत आहे. ईशा पहिल्यांदाच संजूसोबत स्क्रीन शेअर करत आहे. संजू राठोडचा धाडसी आवाज आणि त्याच्या आकर्षक साऊंडमुळे आणि सांस्कृतिक समृद्धतेमुळे ईशा आणि संजूची हटके केमिस्ट्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे. मात्र गुलाबी साडी आणि काली बिंदी या गाण्याप्रमाणे ‘शेकी’ हे गाणंसुद्धा तितकेच हिट होणार का, हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.
शेकी बद्दल काय म्हणाला संजू राठोड?
“शेकी” या गाण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना संजू म्हणाला, “हे गाणं तयार करणं म्हणजे पारंपरिक आणि ग्लोबल यांच्यात एक बारीक दोरावर चालण्यासारखं होतं. मी देसी आत्मा जपताना नव्या साउंड्सचा प्रयोग करायचा प्रयत्न केला. ईशासोबत पहिल्यांदा काम करणं एक जबरदस्त अनुभव होता. ती स्क्रीनवर खूपच ऊर्जा आणि ग्रेस घेऊन आली. त्यामुळे गाण्याचा मूडच बदलून गेला. ‘शेकी’ हे मराठी पॉप संस्कृतीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या माझ्या प्रवासातील पहिलं पाऊल आहे. ही पुढची मोठी लाट असेल, हे नक्की.”