मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त केला जात असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनीही सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने या घटनेसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे.
Shocked and deeply saddened by the tragic attacks on innocent people in Pahalgam.
The affected families must be going through an unimaginable ordeal – India and the world stand united with them at this dark hour, as we mourn the loss of lives and pray for justice.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 23, 2025
त्याने लिहिले, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला आणि खूप वाईट वाटले. या हल्ल्यातील पीडित लोकं आणि त्यांचे कुटुंब कल्पना पलीकडच्या वेदनांमधून जात असतील. त्यांच्या या दुःखात आपला देश आणि संपूर्ण जग त्यांच्यासोबत उभे आहे. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल मी शोक व्यक्त करतो, आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करतो.”
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेदेखील तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्राने व्यक्त केला शोक
ऑलिंपिक खेळाडू पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा यांनीही हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पीडितांना भावनिक दुःख आणि पाठिंबा व्यक्त केला. “जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना”, असे नीरज चोप्रा यांनी एक्स वर लिहिले. तर पीव्ही सिंधूने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांसाठी मी दुःख व्यक्त करते. कोणी कधीही अशा क्रूरतेचे समर्थन करू शकत नाही. मृत व्यक्तींच्या कुटुंबांचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत.”