नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक मारले गेल्यामुळे जम्मू काश्मीरमधील इतर पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पर्यटक शक्य तितक्या लवकर काश्मीरमधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता विशेष गाडी सोडणार आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार, ०४६१२ ही श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली ही विशेष गाडी बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता सुटणार आहे. गाडी रात्री ९.२० वाजता जम्मूतील कटरा रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे. ही गाडी गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. कटरा ते नवी दिल्ली या प्रवासात ही विशेष गाडी जम्मू तवी, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, धांडारी कलान, अंबाला कॅन्टोन्मेंट, कुरुक्षेत्र जंक्शन, पानिपत या स्थानकांवर थांबणार आहे.
रेल्वेची दिल्ली ते काश्मीर दरम्यानची सामान्य वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. ०४६१२ ही विशेष गाडी फक्त एक दिवसापुरतीच धावणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.