शांतिगिरी महाराजांचा धार्मिक संदेश
वेरुळ : “अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वकाळात यज्ञ, जपानुष्ठान करा… हाच खरा अध्यात्मिक मार्ग आहे,” असा पवित्र संदेश जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी दिला असून, श्रीक्षेत्र वेरुळमध्ये ‘ओम् जगदगुरु जनशांती धर्म सोहळ्या’च्या भव्य प्रारंभाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे.
२८ एप्रिल ते ५ मे दरम्यान होणाऱ्या या सोहळ्याचे ७१ फूट उंच धर्मध्वजारोहण आमदार संजय केनेकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सहा धर्मध्वज आणि लक्षवेधी पालखी मिरवणुकीने धार्मिक वातावरण भारावून गेले.
मिरवणुकीत धर्मध्वजासह कलश घेऊन चालणाऱ्या महिला, कुमारिका आणि हजारो भाविक सहभागी झाले होते. यावेळी जगदगुरु बाबाजींच्या समाधीस्थळी मोठ्या भक्तिभावाने उपक्रम राबवले गेले.
स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जगदगुरु जनार्दन स्वामींच्या तपस्वी जीवनाविषयी, त्याग, साधना आणि यज्ञपरंपरेच्या पवित्र अध्यात्मिक मूल्यांविषयी सविस्तर सांगितले. त्यांनी म्हटले, “जपयज्ञ, तपयज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि उदरभरण हाही एक यज्ञ आहे. वेरुळ ही भूमी काशीहूनही पुण्यवान आहे. इथेच बाबाजींनी पहिला यज्ञ केला होता.”
श्रीक्षेत्र वेरुळ येथे होणाऱ्या महायज्ञ, जपसत्र, साधना आणि गुरुभक्तीचे अनुष्ठान यामध्ये प्रत्येक भाविकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
“गुरुभक्ती करताना समर्पण आणि आज्ञापालन हाच खरा मार्ग आहे,” असा गुरुज्ञानाचा संदेशही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी दिला.