बीड प्रकरणाशी तुलना करू नये, आमदार निलेश राणेंचा इशारा
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ मधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उबाठा यांच्या पक्षात होता. माजी आमदार वैभव नाईक यांचा तो कार्यकर्ता होता. असे असताना आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे व बीड मधील संतोष देशमुख खून प्रकरणाशी तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करण्याचा वैभव नाईकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी दिला आहे.
पैशाच्या व्यवहारातून सिद्धेश शिरसाट याने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी हा खून झाला तेव्हा सिद्धेश शिरसाट हा उबाठा यांच्या शिवसेना पक्षात व माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत मिरवत असतानाचे अनेक फोटो आहेत. या खुनानंतर तो वैभव नाईक यांच्या पक्षाच्या आश्रयाखाली होता व त्यांचेच काम करत होता. त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीची बॉडी कुठे गायब झाली व त्यावर आरोपीनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कसा घटनाक्रम राबविला याबाबतची अधिकची माहिती वैभव नाईक यांना माहित असेल.
आपण शिंदे शिवसेनेमध्ये आठ महिन्यापूर्वी प्रवेश केला होता. तो खून दोन वर्षांपूर्वीच झाला होता. त्यामुळे आमच्यावर व आमच्या पक्षावर असे आरोप करताना किंवा त्याबाबतचे राजकारण करताना वैभव नाईक यांनी आपले हसू करून घेऊ नये. त्यांचा बौद्धिक विकास नसल्यामुळे ते हास्यास्पद विधाने करीत आहेत.
यापुढे जरी गाडीखाली कुत्रा आला व मेला तरी तो राणेंच्या गाडीखाली आला व मेला म्हणून वैभव नाईक प्रेस घेऊन माहिती देतील,असेही आमदार निलेश राणे म्हणाले. खरे तर बीड मधील घटना व हा खून यांचा संबंध लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करणे या माजी आमदारांना शोभत नाही. यापुढे सिंधूची बदनामी सहन केली जाणार नाही. जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही याची दक्षता यापुढे त्यांनी घ्यावी.
आमचे नेते शिंदे साहेब, फाटक साहेब यांचे फोटो व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही. वैभव नाईक यांनी आयुष्यभर हेच केले. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधी पदावरून पायउतार व्हावे लागले. राणे कुठे चुकतात याची संधी वैभव नाईक शोधत असतात. पण आरोप करताना आपले कुठे हसू होऊ नये किंवा जिल्ह्याची बदनामी होऊ नये याचे भान त्यांनी ठेवावे असा सल्लाही आमदार निलेश राणे यांनी दिला.