९५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश
अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये १०३ जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. पैकी ९५ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.
रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या १३ तालुक्यांपैकी १२ तालुक्यात खुनाचे गुन्हे घडले असून, त्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर व रोहा या तालुक्यांमध्ये घडले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २८ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यामार्फत जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हे घडू नये, यासाठी पोलिसांमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीही केली जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील पोलिसांकडून केली जाते. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, जिल्ह्यात संशयावरून व अन्य कारणावरून खून करणाऱ्यांचा आकडादेखील वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रलंबित गुन्ह्यांबाबत कायमची फाईल बंद केली जात नाही. संबंधित आरोपींचा शोध सुरुच असतो. त्यांची माहिती घेण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असते. -सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड