लखनऊ: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३०व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला ५ विकेटनी हरवले. अनेक पराभवानंतर चेन्नईने हा विजय पाहिला. लखनऊने चेन्नईसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान ५ विकेट राखत पूर्ण केले.
चेन्नईने सुरूवात चांगली केली. शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांनी ५२ धावांची दमदार भागीदारी केली. रचिनने ३७ धावा केल्या. तर रशीदने २७ धावा केल्या. या दोघांना बाद केल्यानंतर पुढचे दोन विकेट झटपट पडले. राहुल त्रिपाठी आणि रवींद्र जडेजा झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर शिवम दुबेने सामना सावरला. शिवम ४३ धावांवर नाबाद राहिला तर महेंद्र सिंग धोनी २६ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल
पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या लखनऊची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकांत अहमदने मार्करमला बाद केले. यानंतर निकोलस पूरनही चौथ्या षटकांत बाद झाला. पूरनने केवळ ८ धावा केल्या. यानंतर पंत आणि मार्श यांच्यात चांगली भागीदारी झाली. मात्र १०व्या षटकांत जडेजाने मार्शला बोल्ड केले. यानंतर १४व्या षटकांत जडेजा चांगल्या लयीमध्ये दिसला. त्याने बदोनीला बाद केले. बदोनीने २२ धावा केल्या. पंत एकाबाजूला खेळत होता. त्याने ६३ धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर लखनऊने चेन्नईला १६७ धावांचे आव्हान दिले आहे.