नवी दिल्ली : बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचे स्वप्न पाहिले होते. संविधानात त्यांनी सामाजिक न्यायाची व्यवस्था केली होती. त्यातही खंजीर खुपसून काँग्रेसने संविधानाच्या या तरतुदींना लांगूलचालणाचे माध्यम बनवले. सत्ता हस्तगत करण्याचे एक हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्तेचं संकट दिसले, तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवले. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावले. आपल्याच हाती सत्ता राहावी म्हणून त्यांनी हे केले. काँग्रेसने बाबासाहेबांना सतत अपमानित केले. त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला बाबासाहेबांचे विचार कायमचे संपवायचे होते. डॉ. आंबेडकर हे संविधानाचे रक्षक होते, पण काँग्रेस संविधानाचा भक्षक बनली, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी हिसार ते अयोध्येसाठी व्यावसायिक विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला आणि हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. या दरम्यान ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘काँग्रेस देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले. काँग्रेस नेते स्विमिंग पूलसारख्या सुख-सुविधांचा आनंद घेत होते. मात्र, गावांतील प्रति १०० घरांमागे केवळ १६ घरांनाच पाईपने पाणीपुरवठा होत होता. याचे सर्वाधिक नुकसान एससी, एसटी आणि इतर मागासवर्गीयांचे झाले. कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि मागास वर्गाचे अधिकार काढून घेत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले. मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही, असे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले असल्याचे मोदी म्हणाले.
नव्या तरतुदींमुळे वक्फच्या पवित्र भावनेचा होणार सन्मान
पंतप्रधान मोदी यांनी वक्फ कायद्यावरून काँग्रेसवर थेट निशाणा साधत पुढे म्हणाले की, काँग्रेसने केवळ काही कट्टरपंथीयांनाच खूश केले. उर्वरित समाज दयनीय, अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या या वाईट धोरणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा. आता नव्या वक्फ कायद्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील आदिवासींच्या कोणत्याही जमिनीला ते हात लावू शकणार नाहीत. मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा कुटुंब, महिला आणि खासकरून मुस्लिम विधवा, मुलांना हक्क मिळेल. त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. हाच खरा न्याय आहे. काँग्रेसला मुस्लिमांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे. संसदेत मुस्लिमांना ५० टक्के तिकीट द्यावे. ते जिंकून आले तर त्यांचे म्हणणे मांडतील. पण काँग्रेसला तसे करायचेच नाही. मुस्लिमांचे भले करावे, असेही त्यांना कधी वाटले नाही. हेच काँग्रेसचे खरे वास्तव आहे. नव्या तरतुदींमुळे वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
गरीबांना फायदा होईल
वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंतांना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता. पण या मालमत्तेचा फायदा भू-माफियांना मिळाला. आता या नव्या दुरुस्ती विधेयकामुळे गरीबांची लूट बंद होणार आहे, असा दावा मोदींनी केला.