Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकोकणचा ज्ञानेश्वर : संत सोहिरोबानाथ

कोकणचा ज्ञानेश्वर : संत सोहिरोबानाथ

कोकण आयकॉन – सतीश पाटणकर

तळ कोकणावरच्या नाथ संप्रदायाच्या प्रभावाचं ठसठशीत उदाहरणं म्हणजे संत सोहिरोबानाथ त्यांच्या काव्याचा आणि विचारांचा गाभा वारकरी प्रेरणेचाच आहे. म्हणूनच बा. भ. बोरकर त्यांना ‘कोकणचा ज्ञानेश्वर’ म्हणतात. ‘हरिभजनाविण काळ घालवू नको रे, अंतरिंचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ हे गाणं कुणाचं? या प्रश्नावर शेकडा नव्याण्णवांचं उत्तर असतं पंडित जितेंद्र अभिषेकी. पण यातला सगळ्यांना भावणारा संदेश आहे, संत सोहिरोबानाथांचा.

संत सोहिरोबानाथ मराठी साहित्य सृष्टीलाच नव्हे तर हिंदी साहित्यातही या दिव्यत्वाने भरभरून दिले आहे अशा चमत्काराचे नाव आहे संत सोहिरोबा नाथ. सोहिरोबांचे मूळ आडनाव संझगिरी. सावंतवाडी संस्थानातील पेडणे महालातील स्थलांतरित झालेले हे कुटुंब. कुठ्ठाळीहून हे कुटुंब स्थलांतरित झाले ते सावंतवाडी संस्थानातील पेडणे महालातील पालये गावात. तेथे त्यांना आंबिये हे गोड उपनाव मिळाले. इ. स. १७१४ मध्ये त्यांचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आले अच्युत. योग्यांची साक्षात लक्षणे घेऊनच हे अलौकिक बाळ जन्माला आले. कुलकर्णी पद त्यांच्याकडे वडिलांकडून चालत आलेले. पुढे ते बांदा येथे मातोश्रीसह राहू लागले. मात्र परमेश्वराच्या चिंतनाखेरीज त्यांना दुसऱ्या कशात गोडी लागेना.

मुलाला एखाद्या दिवंगत पूर्वजाचे नाव ठेवण्याची परंपरा आजही कोकणात आहे. या परंपरेप्रमाणे सोहिराबानाथांचे नाव ठेवण्यात आले. मात्र प्रेमाने त्यांना सोयरू अशी घरातील ज्येष्ठ मंडळी हाक मारायची आणि घरातले सोयरू सोहिरोबानाथ झाले. बांदे ऊर्फ एलिदाबाद हा तेव्हा शहरवजा गाव होता. सावंतवाडीच्या जवळच्या या गावात सोहिरोबानाथांचे कुटुंब वस्तीला आले. आंबिये मंडळी या नव्या गावी आली तेव्हा सोहिरोबांची मुंज झालेली होती. तत्कालीन समाजावर नाथ संप्रदायाचा मोठा पगडा या भागात असल्याचे दिसून येतो. सोहिरोबानाथही यातून सुटले नाहीत. त्यांच्यावर गोरक्षनाथाचा मोठा प्रभाव. सोहिरोबांना गुरूमंत्रही त्यांनीच दिला. त्यांच्या उपलब्ध कवितेत गोरक्षनाथांवरचे एकच पद आठवते. याच्या उलट गैबीनाथासंबंधीचे उल्लेख वारंवार आढळतात. मग हा गैबीनाथ कोण प्रश्न समोर येतो. मराठी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करताना दोन गैबीनाथ आढळतात. कै. बा. भ. बोरकर यांनी याची उकल करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. या दोन गैबीनाथांपैकी एक गहिनीनाथ आणि दुसरे ज्ञानेश्वरांचे शिष्य सत्यामलनाथांचे यांचे शिष्य गैबीनाथ. महाराष्ट्र भाषाभूषण आजगावकर यांच्या मते गोरक्ष शिष्य गहिनीनाथ हेच सोयरोबांचे गुरू होते. हिंदू लोक त्यांना गैबीनाथ आणि मुसलमान त्यांना गैबी पीर असे म्हणतात. सोहिरोबानाथांबद्दल अधिक जाणण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा पावला- पावलावर आश्चर्याचा धक्का बसतो. इतिहासकारही चकित व्हावेत, असे एक एक दाखले मिळू लागतात. आपले उभे आयुष्य ईश्वर भक्तीत व्यस्त असताना वंशपरंपरागत आपल्याकडे कुळकर्णीचे काम आले आहे. ते नेटाने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी हे काम सुरू केले. २० वर्षे इमाने-इतबारे चालविल्यानंतर आता पुढे यातच रमणे योग्य नाही, असे समजून त्यांनी या कामांचा राजीनामा दिला.

चरित्रकारांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. त्यांना साक्षात्कार झाला. नंतर त्यांनी चाकरी सोडली असेही कुणी म्हणतात, तर कुणी ईश्वर भक्तीत व्यस्त असताना जाणीवपूर्वक त्यांनी काम करण्याचे टाळले असेही म्हटले जाते. येथे तर्क आणि अनुमान लावण्याचा प्रयत्न केला तर असेही लक्षात येते की, सोहिरोबानांचे वडील निवर्तले किंवा अपंग तरी झाले असावेत. अनेक ग्रथांत त्यांची आई, एक विधवा बहीण, पत्नी आणि दोन मुलगे यांचा संदर्भ सापडतो. त्यांना एक भाऊही होता. त्यांचे वंशज आजही बांद्याला आहेत. अल्पवयात कुटुंबाचा बोजा शिरावर घेणाऱ्या सोहिरोबानाथांना कोकणच्या दलित मुलखातून कुळकर्णीची नोकरी सालसपणे, इमाने-इतबारे केल्याचे इतिहासकार सांगतात.

घरच्या गरिबीमुळे आपल्या कवितांसाठी लागणारा कागदही ते विकत घेऊ शकत नव्हते. त्यांची बहीण फणसाच्या कोवळ्य़ा पानांवर ते लिहून त्यांचे पेळे नीट लावून ठेवत असे. एकदा या उभयतांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आईने पाचोळा समजून सरळ न्हाणीच्या चुलीत घातले होते. अशा ओढग्रस्त स्थितीत सोहिरोबांनी तेवढी प्रचंड साधना कशी केली असेल, याचा अचंबा वाटतो. भस्मसात झालेल्या कवितेबद्दल त्यांच्या तोंडून दु:खाचा उद्गारही निघाला नव्हता, असे त्यांच्या भगिनीने लिहून ठेवल्याचेही इतिहासकार सांगतात. सोहिरोबानाथ यांच्याबाबत एक किस्सा सांगितला जातो, त्या दिवशी कडक ऊन होते. सावंतवाडीतून राजेसाहेबांचे तातडीचे निमंत्रण आले. फणस घेऊन नाथ निघाले. इन्सुली मेटाच्या खाली विश्रांतीसाठी वडाच्या झाडाखाली ते थांबले. फणस फोडला. आता गरे खाणार, एवढ्यात त्या वनातून स्पष्ट आवाज ‘बाबू हमको कुछ देता है?’ तेव्हा नाथांनी या आपण तृप्त व्हा, असे सांगितले. स्वरांची जागा आकृतीने घेतली. भव्यपुरुष, नाथपंथी वेश योग्याने फणसाची चव चाखली. पाच गरे सोहिरोबांना दिले. योग्याने ‘मी गहिनीनाथ, गैबीनाथ, तुझे वैराग्य पाहून संतुष्ट झालो. तू यापुढे अच्युत आंबिये नव्हेस, तू सोहिरोबा सोऽहं मंत्राचा जप कर. अमर होशील’ असा आशीर्वाद दिला. हा गहिनीनाथांचा साक्षात्कार नाथांच्या जीवनातील परिवर्तनबिंदू ठरला. सावंतवाडी दरबारात जाऊन त्यांनी राजाकडे राजीनामा दिला अन् पुन्हा बांद्याची वाट धरली. यावेळी नाथांच्या मुखातून अनेक पदे निर्माण होऊ लागली. पण नाथांनी ती लिहून ठेवली नाही. मात्र, आज जी शेकडो पदे उपलब्ध आहेत ती नाथांच्या भगिनीने लिहून घेतलेली. नाथांच्या सान्निध्यात राहून तोंडावाटे बाहेर पडणारी संतवाणी ती लिहून घेई. पुढे मग गुरुकृपेने आलेला आत्मानुभव शब्दबद्ध होऊन गीतबद्ध होऊ लागला.

सोहिरोबांचे मराठी, हिंदी, संस्कृत आणि कोकणी या चारही भाषांवर असाधारण प्रभुत्व होते. ज्ञानेश्वरीचाही त्यांच्यावर मोठा पगडा होता. त्यांच्या हिंदी कविताही अभ्यासताना तिच्यातील प्रसाद आणि लय विस्मयचकित करणारी आहे. सिद्धांत संहिता हा त्यांचा मूळ ग्रंथ संस्कृत आहे आणि तोही काव्यात्मक आहे. या सूत्रात्मक ग्रंथावर त्यांनी ओवी भाष्य लिहिले आहे. त्यात त्यांचा पूर्वसुरीचा सिद्धांत ग्रंथाचा गाढा अभ्यास दिसतो. त्यांच्या रचना वाचताना वेद, उपनिषदे, षड्दर्शने, ब्रह्मसुत्रे, भगवतगीता, संस्कृत धर्म ग्रंथ, प्राकृत काव्ये, पुराणे यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला असावा, असे वाटते. सोहिरोबांची उपलब्ध पदसंख्या ७०० च्या आसपास आहे. त्यातील बहुसंख्य पदे राग तालातली आहेत. त्यातले काही राग जितके अन्वट आहेत, तितकेच काही ताल बिकट लयीतले आहेत. बा. भ. बोरकर यांनी सोहिरोबानाथांच्या सर्व पदसंख्यांचा अभ्यास करताना नव्या पिढीसमोर ते अधिकाधिक पोहोचायला हवेत म्हणून मोठे प्रयत्न केले होते. सोहिरोबानाथांची काव्यस्फूर्ती आणि त्यांनी रचलेला ‘चिजा’ यांचाही अभ्यास व्हायला हवा. म्हणजे प्रगल्भतेचा साक्षात्कार होईल. या सिद्धीच्या मागे दीर्घ साधना असलीच पाहिजे.

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ।। १।।
दोरीच्या सापा भिवुनी भवा।
भेटी नाही जिवा-शिवा।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।। २।।

अशी अनेक रसाळ पदे निर्माण करून कोकणासह संपूर्ण उत्तर भारतात नाथपंथाची ध्वजा लावणारे श्री संतश्रेष्ठ सद्गुरू सोहिरोबानाथ आंबिये यांना इन्सुली (ता. सावंतवाडी) मेटाच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण वटवृक्षाच्या सावलीत सोहिरोबांना गहिनी नाथांचा कृपाप्रसाद लाभला. तेथेच नाथभक्तांनी त्यांचे भव्य मंदिर उभारून त्यांची स्मृती जोपासली आहे. वैशाखी पौर्णिमेला येथे आत्मसाक्षात्कार दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी होतो.

गुरुकृपेमुळे व शब्दज्ञान प्रावीण्यामुळे आत्मप्रचितीचे पारमार्थिक ग्रंथ नाथांनी लिहिले. सिद्धांत संहिता, महद्नुभवनेश्वरी, अद्वयानंद, पूर्णाक्षरी, अक्षयबोध यांचा त्यात समावेश आहे. वाचा सिद्धी प्राप्त झालेल्या या नाथांची ग्रंथ संपत्ती ही चाळिशीच्या आतील आहे. संसार करता करता मुक्ती मिळविता येते आणि नंतर संसार चालवला तरी मुक्तावस्थेत बाधा येत नाही. हाच धडा त्यांनी संसारीजनांना दिला. तत्पूर्वी होडावडे (वेंगुर्ले) येथील नाथभक्त कै. भगवंत बाळकृष्ण पै रायकर यांनी नाथांची पदे, वाङ्मय छापले. त्यानंतर कै. वैजनाथ कुलकर्णी यांनी पदसंग्रह छापले. नाथवंशज प्रा. द. अ. आंबिये यांनीही नाथांची पदे सर्वदूर पोहाेचण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली. सोहिरोबांची ही पदे जात्याच श्राव्य आहेत.

सोहिरोबा वयाच्या साठाव्या वर्षी आपल्या दोघाही मुलांसह घर सोडून निघाले. उजैनपर्यंत ते पोहोचल्याचा तपशील मिळतो. उजैनचा मठ बांधून होण्यापूर्वी सोहिरोबांचा मुक्काम तेथील एका धर्मशाळेत होता. दिवसा त्यांचा बहुतेक वेळ समाधी अवस्थेत जाई. शके १७१४ म्हणजे सन १७९२ च्या चैत्र शुद्ध नवमीला सोहिरोबा एकाएकी अदृश्य झाले. ते कुठे गेले याचा कुणालाच थांगपत्ता नाही. रात्री झोपलेले त्यांना सर्वांनी पाहिले, सकाळी बिछान्यावर ते दिसले नाहीत.

( लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत. )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -