बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. संस्कार सोनटक्के या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये तो इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चंद्रपुरात ४०.६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत.