चेन्नई : तामिळनाडूत २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि अण्णाद्रमुक या पक्षांनी युती जाहीर केली आहे. ही युती करत असतानाच भाजपाने तामिळनाडूसाठी नव्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष म्हणून नयनार नागेंद्रन सूत्र हाती घेत आहेत.
भाजपा – अण्णाद्रमुक युती तामिळनाडूत विधानसभेची निवडणूक लढवेल. ही निवडणूक अण्णाद्रमुकचे अध्यक्ष ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी जाहीर केले.
जागावाटप योग्य वेळी जाहीर होईल. निवडणूक जिंकल्यानंतर योग्य वेळी मंत्र्यांबाबतची घोषणा केली जाईल. दोन्ही पक्ष एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही; असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी सांगितले.
नयनार नागेंद्रन यांची तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीत नयनार नागेंद्रन यांच्या विरोधात कोणीही उभे राहिले नाही, असे सांगत अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. तामिळनाडू भाजपाचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, माजी केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन, भाजपा आमदार आणि महिला मोर्चा अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी नयनार नागेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदासाठी ठेवला होता. लवकरच के. अण्णामलाई यांच्याकडे पक्षाकडून नवी मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे वृत्त आहे.