अमेरिकेच्या १४५ टक्के टॅरिफला चीनचे १२५ टक्के टॅरिफने प्रत्युत्तर
बीजिंग : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्धाचा भडका उडाला आहे. टॅरिफ अर्थात आयात शुल्क लावण्यावरुन दोन्ही देश इरेला पेटले आहेत. अमेरिकेने चिनी मालावर १४५ टक्के टॅरिफ लादला आहे. याला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या मालावर १२५ टक्के टॅरिफ लादत असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प प्रशासन चिनी मालावर टॅरिफ लादून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियम आणि संकेतांचे उल्लंघन करत आहे, असे चीनने अमेरिकेवर टॅरिफ लादताना जाहीर केले.
बीजिंग स्टेट काउंसिल टॅरिफ कमिशनने अमेरिकेचा टॅरिफ बाबतचा निर्णय अनाकलनीय आणि हटवादी स्वरुपाचा असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या आकड्यांच्या या खेळामुळे त्यांचेच नुकसान होणार आहे, असे मत चीनच्या जिनपिंग प्रशासनाने व्यक्त केले. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाच्या विरोधात चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार नोंदवली आहे.
चीनने अमेरिकेच्या मालावर १२५ टक्के टॅरिफ लागू करतानाच अजून एक घोषणा केली आहे. अमेरिकेची इच्छा असेल तरच टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी चर्चा होईल अन्यथा नाही, अशी ठाम भूमिका चीनने घेतली आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध आणखी तीव्र होणार की काही दिवसांनी थंडावणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अमेरिकेने चीन वगळता इर देशांवर लागू केलेले नवे टॅरिफ तात्पुरते स्थगित केले आहे. सर्व देशांशी चर्चा करणार आणि नवे व्यापारी करार करणार, असे अमेरिकेने जाहीर केले आहे.