कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकरला दोन दिवसांपुर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर आज तो कळंबा तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र त्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच सुरक्षा मिळणार आहे.
Prashant Koratkar : छ. शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर जामीनावर सुटला!
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. कोरटकर पाच दिवस पोलीस कोठडीत, तर १० दिवस न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर ३० मार्च रोजी त्याला १४ दिवसांची आणखी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. आणि आज तो कोल्हापूरच्या कळंबा तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातून बाहेर येताच प्रशांत कोरटकरने नागपूरपर्यंत सुरक्षा देण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. मात्र कोल्हापूर पोलिस त्याला केवळ जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सुरक्षा देणार आहेत. दरम्यान प्रशांत कोरटकरची जामिनावर सुटका झाल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे